सोयाबीन धोक्यात : गळताहेत कपाशीचे बोंड कांरजा (घाडगे), घोराड : प्रारंभी उशिरा झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पेरण्या लांबल्या. यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने आता शेतातील पीक धोक्यात आले आहे. गत तीन आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाला असल्याने जमिनी भेगाळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कापनीवर आलेले सोयाबीन व बोंडावर आलेली कपाशी धोक्यात आली आहेसोयाबीनला सध्या शेंगा पकडल्या आहेत. या शेंगा आता भरण्याची वेळ आली आहे. अशाच वेळी पारा चढत असून त्याचा विपरीत परिणात सोयाबीनवर होणार आहे. या काळात जर एक दिवस पावसाचा आधार मिळाला तर शेंगा भरण्यास मदत होईल, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. पावसाच्या दडीने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतातील जमिनी भेगाळल्या आहेत. यातून रोपट्यांची मुळे उघडी पडत असून ती वाळत आहेत. याचा परिणाम उत्पन्नावर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात ७ सप्टेंबरपर्यंत काही का होईना पण पावसाची रिमझीम सुरू होती. हा पाऊस हस्त नक्षत्रात एक दिवस जरी आला तरी सोयाबीनला उपयुक्त ठरेल. अशी आशा बाळगून असलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या आशेवर मात्र पावसाच्या दडीने पाणी फेरले आहे. दरवर्षी नवरात्र ते दिवाळीच्या कालावधीत सोयाबीनची कापणी व मळणीचा हंगाम असतो. मृग नक्षत्र कोरडे गेले. यात दुबार-तिबार पेरणी झाली. यात आता सोयाबीन शेंगा भरण्याची व दाणा परिपक्व होण्याची वेळ आहे.४ ते ७ सप्टेंबरला पावसाच्या सरीने दिलासा मिळाला होता. गत १५ दिवसांपासून कडक उन्ह तापत आहे. यामुळे सोयाबीनवर असलेली आर्थिक बाजू धोक्यात आली आहे. यंदाचा खरीप हंगाम पूर्वीपासूनच धोक्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी यंदा उत्पन्न होईल अथवा नाही याचा कयास पहिलेच लावला होता. उशिरा आलेल्या पावसामुळे त्यात सातत्य राहील असे वाटत असताना पुन्हा पावसाने दिलेली दडी चिंतेचा विषय ठरत आहे. या हंगामात एका मागून एक संकट शेतकऱ्यांवर येत असून त्याचा सामना करावा लागत असल्याने त्याला अडचणीचा सामना करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी/वार्ताहर)
जमीन भेगाळली
By admin | Published: September 30, 2014 11:39 PM