वर्धा : आपण अशा पक्षाचा कार्यकर्ता आहो की, जेथे आपण किती वर्ष सत्तेत होतो हे महत्त्वाचे नाही तर लोकांना आठवण देत किती कामे करू शकलो हे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत राज्यात ४७६ मंत्री झाले; पण नावे विचारली असता केवळ २५ ही नावे नागरिकांना घेता येणार नाही. म्हणून आमचा प्रयत्न आहे की जेव्हाही नाव निघावे तेव्हा काम करणारे म्हणून निघावे नाहीकी २५ वर्ष विकास कोमात ठेवणारे म्हणून नाव निघू नये, असा टोला राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धेचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला.
स्थानिक जिल्हा ग्रंथालयाच्या इमारतीच्या लोकार्पण व जाहीर ऋणनिर्देश कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खा. विजय मुडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाने आदींची उपस्थिती होती.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या सोयी-सूविधा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी सरकार प्रयत्नही करीत आहे. शिक्षण व आरोग्य यासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्रत्येक जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील १४ जिल्ह्यात नाट्यगृह नसल्याने तेथे नाट्यगृह व्हावे आणि तेथील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यात वर्धेचाही समावेश आहे. वर्धेचे नाट्यगृह आधुनिक असावे यासाठी जिल्हाधिका-यांनी तात्काळ बैठक लावून येत्या दहा दिवसात नाट्यगृह समिती तयार करावी. यात स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश करावा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्यात.