वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही गावांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण दरवर्षी टंचाई आराखडा तयार करून अशा गावांमध्ये प्राधान्याने पाणीपुरवठ्याची कामे प्रस्तावित करतो. ही कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासोबतच जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या प्रस्तावातील कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.
वर्धा तालुक्यातील प्रत्येक गावाचा सरपंच व सचिवाच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बैठकीला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपवनसंरक्षक राकेश सेपट, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी राजू कळमकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी या वेळी गावनिहाय पाणीटंचाई, जलजीवन मिशन, अतिक्रमण नियमानुकूल करणे, अंगणवाडी बांधकाम, वर्गखोल्या बांधकाम, उप आरोग्य केद्र बांधकाम, जनसुविधा व नागरी सुविधा, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामाची सद्यस्थिती, पाणंद रस्ते यांसह विविध विषयांचा आढावा घेतला.
टंचाईची कामे करताना गावांना उन्हाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा हा उद्देश असतो. परंतु उन्हाळा संपत असतानाही कामे पूर्ण होत नाही. असे होता कामा नये. मंजूर झालेल्या आराखड्याप्रमाणे कालमर्यादेत ही कामे करण्यात यावी. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामेसुध्दा प्राधान्याने आणि काल मर्यादेत पूर्ण करण्यात यावी. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी निकषाप्रमाणे आपल्या गावातील पाण्याची नियमित जलतपासणी करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देणे, विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव, कृषिपंप जोडणी, स्मशानभूमी बांधकाम व दुरुस्ती, घरकुल आदींचाही पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला. प्रत्येक गावातील सरपंच व सचिवांकडून त्यांनी गावातील समस्याची माहिती जाणून घेतली व या समस्या निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
आमदार पंकज भोयर यांनी वर्धा शहरालगत असलेल्या १० ग्रामपंचायतीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा विषय मांडला. शहरालगतच्या गावांचे झपाट्याने शहरीकरण होत असल्याने वाढत्या शहरीकरणास वाढत्या सुविधा पुरविण्याकरिता या गावांचे नगर पंचायतीमध्ये रुपांतरण करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगितले. याबाबत पालकमंत्री महोदयांनी प्राधान्याने लक्ष घालावे, असेही आ. पंकज भोयर या वेळी म्हणाले.