पोलीस विभागाचे आयोजन : पारधी समाजासाठीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम वर्धा : पारधी समाजातील दारू गाळणारे, विक्री करणारे, अवैध व्यवसाय करणारे तसेच गुन्हेगारीकडे वळलेल्या बेरोजगार महिला, पुरूषांना अवैध कृत्यापासून परावृत्त करून त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणून वर्धा जिल्हा पोलीस विभाग नवजीवन योजना राबवित आहे. यात पारधी समाजातील बेरोजगार महिला-पुरूषांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येत आहे. नवजीवन योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील पारधी बेडा वायफड, पांढरकवडा, आंजी अंदोरी व बोरगाव येथील बेरोजगार महिला-पुरूषांना विविध संस्थांच्या सहकार्याने फ्लोर क्लिनर, सुतकताई, रोपवाटिका, धुपबत्ती तयार करणे तसेच शेळीपालन आदी विविध प्रकल्पाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून सर्व प्रशिक्षणार्थी प्राप्त ज्ञानाने स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून समाजात सन्मानाने जीवनमान व्यतीत करीत आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पारधी समाज असून या समाजातील बहुतांश व्यक्ती दारू गाळणे व विक्री करणे, हा व्यवसाय करतात. पारधी समाज हा अनुसूचित जमाती अंतर्गत मोडत असून शासनाच्या त्यांच्याकरिता असलेल्या विविध योजना, सुविधांबाबत त्यांना पुरेसे ज्ञान नाही. पारधी समाजाच्या उत्कर्षाकरिता त्याचप्रमाणे रोजगार मिळून जीवनमान उंचाविण्याकरिता शासनाच्या योजना, सुविधा संबंधाने उचित मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच वर्धा पोलीस विभागाच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे. पारधी समाजातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता त्यांना विविध उद्योग तसेच व्यवसायाचे ज्ञान उपलब्ध शासकीय योजनांबाबत तसेच त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत अवगत करण्याकरिता जिल्ह्यातील विविध विभागाच्या सरकारी अधिकाऱ्यांचा पारधी समाजातील लोकांसोबत प्रत्यक्ष संवाद घडवून आणण्याकरिता १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पोलीस मुख्यालय येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येत आहे. पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना स्वयंरोजगार मिळून आत्मनिर्भर करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम महत्त्वाचा असल्याचे कळविले आहे.(प्रतिनिधी)
नवजीवन योजनेंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम
By admin | Published: March 15, 2017 1:44 AM