शिबिरात प्रतिदिन १७५ रुपये शिष्यवृत्ती : विविध योजनांची दिली माहिती लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : स्थानिक तुळजाई मंगल कार्यालयात दिव्यांग व्यक्तींचा रोजगार मार्गदर्शन मेळावा पार पडला. याप्रसंगी पंतप्रधान कौशल्य योजनेंतर्गत प्रशिक्षणाची नोंदणी तसेच स्वावलंबन विमा योजनेबाबत माहिती देण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत गोरडे तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुऱ्हाटकर, माजी नगराध्यक्ष अब्दुल जब्बार तंवर, अपंग संघटनेचे सिद्धार्थ उरकुडे, सुभाष इंगळे, सुनील मिश्रा, विकास दांडगे, प्रकाश पाचपोर, शैलेश सहारे आदी उपस्थित होते. मेळाव्यात दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पंतप्रधान कौशल्य योजनेंतर्गत आॅनलाईन कॉम्प्यूटर रजिस्ट्रेशन कॅम्प राबविण्यात आला. या योजनेतील लाभार्थ्यांना प्रती दिवस १७५ रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार असल्याचे सांगण्यात आले. दिव्यांग व्यक्तींच्या समस्या सोडविण्यासाठी समाजातील सर्वस्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुऱ्हाटकर यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केली. संचालन शैलेश सहारे यांनी केले. कार्यक्रमाला पं.स. सदस्य अरुणा सावरकर, अमोल क्षीरसागर, ज्ञानेश्वर गिरीपुंजे, चंद्रशेखर देशपांडे, आरती लिव्हारे, चेतना कामटकर, दीपक रघाटाटे, पंकज गावंडे, निसार शेख, मंदार ठाकरे, पवन सुरकार, स्रेहल खोडे, व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते. रविवारी वर्धा व सेलूत आरोग्य मेळावा वर्धा - दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाद्वारे विविध योजना राबविल्या जात आहे. यात आ.डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने ९ जुलै रोजी वर्धा सामान्य रुग्णालय व सेलू ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा विधानसभा क्षेत्रातील सर्व दिव्यांग सकाळी १० ते सायं. ४ वाजेपर्यंत मेळाव्याचा लाभ घेऊ शकतील. ज्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेत बोर्डामार्फत निर्गमित प्रमाणपत्र आहे व ज्यांचे अपंगत्व ४० टक्यांपेक्षा अधिक आहे, त्यांना युडीआय क्रमांक देण्यात येणार आहे. विमा काढणार असून सर्व आरोग्य तपासण्या होतील. देशभर एकच ओळख राहावी म्हणून वैश्विक ओळखपत्रे दिले जात आहे. ४० टक्केवर अपंगत्व असलेल्या दिव्यांगांची वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी नोंदणी होईल. त्यांनी अपंगत्व प्रमाणपत्र, आधार कार्ड वा पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला यांच्या मूळ व सत्यप्रती सोबत आणाव्या, असे आवाहन आ. भोयर यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यात दिव्यांगांना मार्गदर्शन
By admin | Published: July 09, 2017 12:38 AM