लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शिक्षकांचा टीईटी परीक्षेतील प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला २०१३ ते २०१९ या कालावधीतील सर्व प्रमाणपत्रे जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील १४ शिक्षकांची प्रमाणपत्रे पुण्याला पडताळणीकरिता पाठविली होती. परंतु शासनाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये १६ शिक्षक बोगस असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या आकडेवारीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये १३ फेब्रुवारी २०१३ पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत १४ तर खासगी शाळेमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यातील दहा शिक्षकांची नियुक्ती टीईटीच्या माध्यमातून झाली. तसेच माध्यमिक शाळांमध्ये ४ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने प्राथमिकच्या दहा तर माध्यमिकच्या चार अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीकरिता पाठविले होते. पडताळणीकरिता प्रमाणपत्र पाठविल्याने अनेक शिक्षकांची धडधड वाढली आहे. आता शासनाने बोगस शिक्षकांची यादी जाहीर केली असून वर्धा जिल्ह्यात १६ शिक्षक बोगस असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता हे शिक्षक कोणत्या वर्षातील असेल? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.पडताळणीसाठी पुण्याला पाठविले होते १४ शिक्षकांची प्रमाणपत्रे- २०१२ पासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद होती. तरीही प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गावर काही शिक्षकांच्या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेरही नियुक्त्या झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. पण, आता टीईटी परीक्षेतील बोगसपणाच चव्हाट्यावर आल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जिल्ह्यात २०१३ ते २०१९ या कालावधीमध्ये टीईटीव्दारे १४ शिक्षकांची नियुक्ती झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये प्राथमिकचे दहा तर माध्यमिकचे चार शिक्षक आहे. त्यामुळे या १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीकरिता पाठविले होते. आता त्या बोगस शिक्षकांची यादी तयार झाली असून आता नावांची प्रतीक्षा आहे.
बोगस शिक्षकांमध्ये जिल्हा शेवटून पाचवापैशाच्या जोरावर टीईटीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविणाऱ्या गुरुजींचा बोगसगिरीचा बुरखा फाटला आहे. शिक्षण विभागाने प्रमाणपत्रांची पडताळणी करून बोगस शिक्षकांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात १६ शिक्षक बोगस असून आपल्या जिल्ह्याचा क्रमांक शेवटून पाचवा आहे.
जि.प. प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत २०१३ नंतर जि.प.च्या शाळेत १४ तर खासगी शाळेमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली. यातील दहा शिक्षक हे टीईटीव्दारे नियुक्त झाले. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाकडून या दहा शिक्षकांचे तर माध्यमिक शिक्षण विभागातील चार शिक्षक असे एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीस पाठविले होते. परंतु आता शासनाकडून बोगस शिक्षकांची जिल्हानिहाय यादी आली. त्यात १६ शिक्षक असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता हे शिक्षक कोणते? त्यासंदर्भात चौकशी केली जाईल. त्या सर्वांची नावे कळल्या शिवाय समजणार नाही. १६ बोगस शिक्षकांची नावे मागितली जाईल. - निंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक.