अतिक्रमण हटावचा विरोध : बहुजन मुक्ती पार्टीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन हिंगणघाट : केंद्र सरकार द्वारा बजेटमध्ये ओबीसी, एमबीसी बहुजनांसाठी कोणतेही प्रावधान केले नाही. शिवाय अतिक्रमणाच्या नावाखाली होतकरू व बेरोजगार जनतेच्या व्यवसायांवर बुल्डोजर चालविण्याच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने सोमवारी नंदोरी चौकापासून मोर्चा काढण्यात आला. मार्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच शासनाच्या बजेटची होळी करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर यांना निवेदन देण्यात आले.देशभरातील ३१ राज्यातील ५४१ जिल्ह्यातील ४ हजार तहसीलमध्ये राष्ट्रव्यापरी बजट जलाओ अभियानांतर्गत सदर आंदोलन करण्यात आले. या निवेदनात त्यांनी गत वर्षीच्या तुलनेत अनुसुचित जाती, जमातीसाठीची तरतूद कमी केली. इतर मागासवर्गासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही. अल्पसंख्याक समाजासाठी नाममात्र तरतूद असून उद्योगपतींना दिलेल्या पॅकेजच्या तुलनेत शेतकऱ्यांसाठी केलेली तरतूद तटपुंजी असल्याचा आरोप करण्यात आला. सदर मोर्चा उपविभागीय कार्यालयसमोर पोहचल्यानंतर नागरिकांना बजेटमधील तरतुदींची माहिती देत केंद्र शासनाच्या नितीचा निषेध करीत केंद्र शासनाच्या बजेटची होळी केली. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. यावेळी बहुुजन मुक्ती पार्टीचे विदर्भ संघटक किशोर किनकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेश धोटे, उपाध्यक्ष अविनाश सोमनाथे, शरद कांबळे, जिल्हासचिव जगदीश वांदीले, तालुका अध्यक्ष अमोल लाजुरकर, डॉ. किशोर मांडवकर, समुद्रपूर अध्यक्ष राजू भोयर, शेतकरी परिषद जिल्हाध्यक्ष संजय कारमोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
हिंगणघाट येथे मोर्चा काढून बजेटची होळी
By admin | Published: March 31, 2015 1:45 AM