शेतकरी व व्यापारीही त्रस्त : डिसेंबर अखेर १.९८ लाख क्विंटल कापसाची आवक आर्वी : कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून आर्वी हे इतर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे; पण यावर्षी या बाजारपेठेलाही चलन तुटवड्याचा चांगलाच फटका बसला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात २ लाख क्विंटलच्या वर पोहोचणारी कापूस खरेदी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख ९८ हजार ३५७.७९ क्विंटल एवढ्या अत्यल्प कापसाची आवक झाली. रोख चुकाऱ्याअभावी ही आवक मंदावली आहे. आर्वीची कृषी उत्पन्न बाजार समिती व येथील कापूस बाजारपेठ ही विदर्भात प्रसिद्ध आहे. ८ नोव्हेंबरपासून केंद्र शासनाने लागू केलेल्या नोटाबंदीचा फटका सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था व बॅँकांत माल विकून मिळणारा अपूऱ्या पैशातून शेतातील कामावर असलेल्या मजुरांची मजुरी द्यावी कशी, घरखर्च कोणत्या पैशातून चालवावा या नवीन संकटाने तालुक्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. एक महिन्यानंतरही बँकांतील चलन तुटवडा कमी झाला नाही. यामुळे आपल्याच हक्काच्या मालाच्या पैशासाठी शेतकऱ्यांना बॅँकेत चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. सध्या रबी हंगामातील रोख रक्कम मिळवून देणारे कपाशीचे पीक शेतकरी आर्वीत विकण्यासाठी आणत आहे. ५००० ते ५०५० पर्यंत कापसाचा भाव आहे. खासगी व्यापारी या चलन तुटवड्याने त्रस्त असल्याने शेतकऱ्यांनी विकायला आणलेल्या मालाचा थेट धनादेश दिला जात आहे. यात शेतकऱ्यांना रोख रक्कम चुकाऱ्यासाठी पाहिजे असते; पण माल विकलेला धनादेश शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. बॅँकेत जमा झालेल्या धनादेशातून केवळ चार हजार शेतकऱ्याला बॅँकेतून दिले जातात. या रकमेतून तो कामावरच्या मजुराचा चुकारा वा इतर घर खर्च कसा करणार, हा प्रश्नच आहे. या चलन तुटवड्याचा सर्वाधिक फटका कापूस व्यापारी व उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे दरवर्षी डिसेंबर महिन्यात दोन लाखांच्या वर होणारी कापसाची आवक यंदा चलन तुटवड्याने अर्ध्यावर आली. डिसेंबर २०१५ मध्ये आर्वी बाजारात कापसाची २ लाख ४१ हजार ७४० क्विंटल आवक होती. यावर्षी ती केवळ १ लाख ९८ हजार ३५७ हजार क्विंटलच झाली आहे. आर्वीत एकूण १५ जीन सुरू असून यात कापसाचे २७ खासगी व्यापारी, रोहणा दोन, खरांगणा तीन असे ३२ खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत आहे; पण चलन तुटवड्यामुळे कापसाची आवकच घटल्याने व्यापाऱ्यांचीही गोची झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)
चलन तुटवड्याने कापूस खरेदी अर्ध्यावर
By admin | Published: January 01, 2017 2:06 AM