लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा (आर्वी) : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्ण संख्येने सुरु झाल्या नसल्या तरी निम्या बसेस रस्त्यावर धावत आहे. बसचा प्रवास सुरक्षित मानल्या जात असल्याने प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिणामी महामंडळाच्या उत्पन्नातही आता वाढ होत आहे. मागील चार महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने बससेवा ठप्प आहे. परिणामी सर्वसामान्य प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे. शासनाच्या आदेशानुसार बहुतांश कर्मचारी कामावर रुजू झाले असून निम्मे बसेस रस्त्यावर आल्या आहे. बसेच धावायला लागल्याने प्रवाशांचीही गर्दी वाढत आहे. परंतु खेडेगावात अद्यापही बस पोहोचली नसल्याने गावातील प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे. अशातच खासगी वाहनचालकही प्रवाशांकडून दामदुप्पट प्रवासभाडे वसूल करीत आहे. शासनात विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले असून, अद्यापही तोडगा निघाला नाही. बरेच दिवसांच्या संपानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू झाले तर काही अद्यापही संपावरच आहे. त्यामुळे आगारातील ४० ते ५० टक्के बससेवाच सुरु आहे. याचाच फायदा घेत खासगी वाहतूकदारांकडून ग्रामीण प्रवाशांची लूट चालविल्याचे चित्र दिसून येत असल्याने यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात बसेस कधी जाणार..- जिल्ह्यामध्ये पाच आगार असून २१३ बसेस आहे. संपापूर्वी नियमित ७५ हजार किलोमीटर बसेस धावायच्या. परंतु सध्या संपामुळे शंभरावर बसेस धाव आहे. अनेक गावांमध्ये आणि लांब पल्ल्याच्या बसेस सोडल्या जात नाही. त्याचा फटका प्रवांशाना बसत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी व रुग्णांना बस नसल्याने खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागतो. त्यामुळे ग्रामीण भागात बसेस कधी जाणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
गत चार महिन्यांत बसला फटका
- आर्वी आगारातून ४८ बसेस १७ हजार किलोमीटर धावत होत्या. यातून पाच लाखांचे सरासरी उत्पन्न होते. संपकाळात सर्व बसेस बंद होत्या. त्यामुळे या आगाराला ५ कोटींचे नुकसान झाले. तर वर्धा आगारामध्ये ६१ बसेस २१ हजार किलोमीटर धावत होत्या. त्यातून आठ लाखांचे उत्पन्न मिळायचे. जिल्ह्यातील पाचही आगारांना जवळपास २५ कोटींचा फटका बसला आहे.
आगार प्रमुख काय म्हणतात...
सध्या जिल्ह्यात शंभरच्यावर एसटी धावत असून प्रवाशांची गर्दी आहे. मात्र कर्मचारी नसल्याने अद्यापही लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागात बसेस सोडता येत नाही. यामुळे प्रवाशांची तारांबळ होत आहे. संपकऱ्यांच्या बाबतीत २२ तारखेला निर्णय होणार असल्याची माहिती आहे.राजाभाऊ पंधरे, आगारप्रमुख,पुलगाव
आर्वी आगारात सध्या २५ बसद्वारे प्रवाशांची सेवा सुरु आहे. कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेप्रमाणे बसेस सोडण्यात येत असून ९० फेऱ्या होत आहे. मात्र ग्रामीण भागात आणि लांब पल्ल्याच्या गाड्या कमतरतेमुळे सोडता येत नाही. विनोद खंडार, बसस्थान, प्रमुख आर्वी आगार