एका पथकाकडे दोन तालुके : १३ वर्षांपासून हातपंप यांत्रिकीच नाहीविजय माहुरे सेलू ग्रामीण भागात पाणीटंचाई भासू नये म्हणून हातपंप देण्यात आलेत. या हातपंपाची देखभाल व दुरूस्ती करण्याकरिता पथकांची निर्मिती करण्यात आली. या पथकामध्ये यांत्रिकी अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे असते; पण गत १३ वर्षांपासून यांत्रिकी अधिकारीच नाही. परिणामी, यांत्रिकी अधिकाऱ्याविना हातपंपाची देखभाल, दुरूस्ती केली जात आहे.सेलू व समुद्रपूर या दोन तालुक्यातील हातपंप दुरूस्तीसाठी एकच पथक आहे. महिन्याचे १५ दिवस हे पथक एका तालुक्यात तर उर्वरित १५ दिवसांत शासकीय सुट्या पाहता अवघे दहा ते अकरा दिवसच काम होते. एवढ्या अल्पावधीत बंद पडलेले हातपंप कसे दुरूस्ती होतील, हा प्रश्नच आहे. हातपंप दुरूस्तीसाठी नागरिकांना १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती अंतर्गत हातपंप असलेल्या गावाची संख्या ११२ असून ५७० हातपंप आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ पाहता यापैकी बहुतांश हातपंप बंद पडत असतात. १० ते ११ दिवसांत दुरूस्ती पथकाला सर्वच बंद असलेले हातपंप दुरूस्त करणे शक्य होत नाही. यामुळे अडचणीचा सामना करावा लागतो. तालुक्यात २००२ पूर्वी २५० हातपंप होते. तेव्हा दुरूस्ती पथकात यांत्रिकी अधिकारी कार्यरत होता. बारमाही दुरूस्ती पथकही या तालुक्यात राहत होते; पण यांत्रिकी पदावर कार्यरत तत्कालीन अधिकारी एम.एस. माळोदे हे २००२ मध्ये सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून आजपर्यंत १३ वर्षांच्या काळात या पदावर नवीन व्यक्तीची नेमणूक करण्यात आली नाही. हातपंपाच्या दुरूस्ती व देखभालीकडे जि.प. लक्ष देत असून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा हे काम पाहते. हातपंपाची दुरूस्ती यांत्रिकीविना शासकीय अकुशल कामगारांवरच आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत तीन-चार महिने हे दुरूस्ती पथक पूर्णवेळ तालुक्यात कार्यरत असले तरी बारमाही राहणे गरजेचे आहे. सेलू पं.स.त नुकतीच आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत पाणीटंचाईची सभा झाली. यात ३७ हातपंपांची मागणी करण्यात आली. दरवर्षी हातपंप वाढत असल्याने यांत्रिकीविना हातपंपाची दुरूस्ती कशी होणार, हा प्रश्नच आहे. यातील दोष दूर करण्यासाठी यांत्रिकीसह दुरूस्ती पथक बारमाही ठेवावे, अशी मागणी होत आहे.
यांत्रिकी अधिकाऱ्याविनाच हातपंप दुरूस्ती पथक
By admin | Published: January 17, 2016 1:56 AM