वर्धा : घरच्या कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब व शेतीची जबाबदारी स्वीकारत असताना गतवर्षी सोयाबीनची नापिकी व बँकेचे कर्ज फेडू शकत नसल्याच्या विवंचनेत वायगाव (नि.) येथील महिला शेतकरी साधना ज्ञानेश्वर सुपारे (५३) यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने अत्यंत संवेदनशील राहून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांत आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.वायगाव (नि.) येथील महिला शेतकऱ्यांच्या निवासस्थानी भेट देत मुलगा संदीप सुपारे (३५) व सून शीतल सुपारे यांचे सांत्वन केले. आर्थिक अडचणीत असलेल्या या कुटुंबाला संपूर्ण मदत करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, सरपंच गणेश वांदाडे, तहसीलदार राहुल सारंग, रमेश वाळके, हेलोडे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.साधना सुपारे या शेतकरी महिलेने रविवारी जाळून घेत आत्महत्या केली. शेतीमुळे विवंचनेत सापडलेल्या कुटुंबियांची तिवारी यांनी आस्थेने चौकशी केली. चार एकर शेतातील कापूस व सोयाबीन पिकाला आलेला खर्च, स्टेट बँकेचे असलेले कर्ज, गतवर्षी सोयाबीन पिकाची झालेली नापिकी यामुळे कर्ज फेडण्यात विवंचना आदीची माहिती कुटुंबियांनी दिली. शेतीतील विविध अडचणी योजनांचा लाभ मिळण्यासाठी होणारा विलंब सोबतच सततची नापिकी, उत्पादन खर्चाचा मेळ बसत नाही. सोबत कुटुंबातील आरोग्याचा खर्च आदी कारणांमुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांना दिलासा देण्याचे कार्य करावे. अडचणी सोडविण्यासाठी ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांना प्राधान्य द्यावेत, अशी सूचना तिवारी यांनी केल्या.(कार्यालय प्रतिनिधी)
शेतकरी आत्महत्येची प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळा
By admin | Published: September 23, 2015 5:44 AM