लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : समाजातील माणूसकी दिवसे न दिवस लोप पावत चालली आहे. श्रीमंताजवळ असलेल्या चांगल्या वस्तू सर्वसामान्य गरीब लोकांना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने माणूसकीची भिंत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्यांना घेत जावे, हे ब्रीद समोर ठेवून हा उपक्रम चालविला जाणार आहे.संत गजानन महाराज व दुर्गामाता देवस्थानच्यावतीने मंदिराचे परिसरात माणुसकीची भिंत तयार करून त्यांचे अनावरण नगराध्यक्ष गजानन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे ठाणेदार प्रवीण मुंडे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी व्यापारी, मुख्याध्यापक शाशिकांत वैद्य व्यवस्थापक मंगेश भोसले उपस्थितीत होते. माणुसकीच्या भिंतीचा मुख्य उद्देश आपआपल्या घरामध्ये जास्तीच्या असलेल्या वस्तू इतर लोकांना उपयोगी पडाव्यात जसे कपडे, स्वेटर, चादर व इतर वस्तू त्या भिंतीच्या आधारे ठेवून द्यावा व गरजुंनी ज्या वस्तुची गरज असेल त्या वस्तू सहजपणे घेऊन जाव्या व आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी आणाव्या हाच प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य देण्याचे आवाहन करण्यात आले. या अनावरण कार्यक्रमानंतर १० व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वर्ग १ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तु वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाला देवस्थानचे प्रा. मेघश्याम ढाकरे, लहानुजी गांजनवार, नारायण डगवार, सुधीर खडसे, किशोर आस्कर, मधु कामडी, बादल वानकर, पांडे महाराज व जि.प. कर्मचारी आदी उपस्थित होते. तालुका मुख्यालयात पहिल्यादांच माणूसकीच्या भिंतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.