अडचणी आल्यास तहसीलदारांना भेटण्याचे आवाहनवर्धा : खरीप हंगामासाठी शेतकरी खातेदारांना कर्ज व अन्य शेतीविषयक प्रयोजनासाठी सातबारा उतारे तत्काळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता लक्षात घेता ३१ मे पर्यंत हस्तलिखित अधिकार अभिलेख सातबारा उतारे देण्याची शासनाने मुभा दिली आहे. त्यानुसार सर्व तहसीलदारांनी शेतकऱ्यांना कर्ज व अन्य शेतीविषयक कामासाठी हस्तलिखित सातबारा उपलब्ध करून देण्याच्य सूचना सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्यात, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे. ई-फेरफार प्रणालीतून संगणकीकृत सातबाराच्या उताऱ्यांचे प्रिंट आऊट काढून अर्जदारास वितरीत करणे शक्य होत नसेल तर शेतकरी खातेदारांना कर्ज, अन्य शेतीविषयक प्रयोजनासाठी हस्तलिखित अधिकार अभिलेख सातबारा उतारे देण्याची मुभा शासनाने दिली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच जिल्ह्यातील आॅनलाईन सेलू, देवळी, हिंगणघाट व आर्वी तालुक्यात शेतकरी खातेदारांना हस्तलिखित अधिकार अभिलेख सातबारा उपलब्धतेबाबत काही अडचण निर्माण झाल्यास सेलूचे तहसीलदार होळी, देवळीच्या जाधव, हिंगणघाटचे कांबळे, आर्वीचे मस्के, या तहसिलदारांशी संपर्क साधावा. तसेच वर्धा तालुक्यासाठी परांजपे, समुद्रपुरसाठी यादव, आष्टीच्या गजभिये तर कारंजासाठी मडावी यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
शेतीविषयक कामासाठी हस्तलिखित सातबाऱ्याची मुभा
By admin | Published: May 14, 2016 2:01 AM