सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेकंड अनलॉकनंतर शहरासह लगतच्या भागातील हॉटेल आणि रेस्टॉरंटस् आता दहापर्यंत उघडी असणार आहेत. याकरिता शासनाकडून प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण पूर्णपणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे. ‘लोकमत’ चमूने यासंदर्भात शहरातील मुख्य मार्गालगत आणि वळणमार्गालगतच्या हॉटेल्समध्ये सत्यता पडताळली असता बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्याचे दिसून आले. शहरासह लगतच्या भागात ८४ वर हॉटेल्स, रेस्टॉरंटस् असून, सर्वच हॉटेल्स आता पूर्ण क्षमेतेने सुरू झाले आहे. १३९२ च्या जवळपास या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागलेल्या हॉटेल्स व्यावसायिकांना आता दिलासा मिळाला आहे. हॉटेल व्यवसाय आता पूर्ववत उभा राहणार, असा विश्वास हॉटेलमालकांनी व्यक्त केला.
काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी!
हॉटेल १
- वळण मार्गावरील हॉटेलला भेट देऊन तेथील कारागीर आणि कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण झाले काय याबाबत विचारणा केली असता काहींनी लसीकरण झाल्याचे तर काहींनी लसीकरणाकरिता नोंदणी केल्याचे सांगितले.
हॉटेल २
- शहरातील मुख्य मार्गालगत मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स असून, येथील कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत विचारणा केली असता लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले. मोजक्याच कर्मचाऱ्यांचे लसीकरण राहिल्याचे सांगण्यात आले.
शासनाने हॉटेल व्यवसाय अटी, शर्तींच्या अधीन राहून आता १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याकरिता कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्णपणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. हॉटेलमधील ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांची लसीकरणाकरिता नोंदणी केली आहे. काेविड संकट काळात लसीकरण हे महत्त्वाचे आहेच असे सांगण्यात येते.- अजिंक्य भिसे, हॉटेलमालक, सेलू.
लसीकरण झाले की नाही, तपासणार कोण?- सेकंड अनलॉकनंतर हॉटेल व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याकरिता लसीकरण पूर्णपणे झालेले असणे गरजेचे असल्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, लसीकरण झाले अथवा नाही, याची पडताळणी करणारी कुठलीही यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित नाही.
रस्त्यांवर, टपऱ्यांवर आनंदी आनंद- शहरातील विविध रस्त्यांलगत आणि बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चहा, नाश्त्याच्या टपऱ्या आहेत.- अनेक चहा-नाश्त्याच्या टपऱ्यांवरील बहुतांश कारागीर आणि कामगारांचे लसीकरण झालेले नाही.- रस्त्यालगत असलेल्या चहा-नाश्त्याच्या टपऱ्यांपर्यंत शासनाची कोणतीही यंत्रणा पोहोचली नसून जनजागृतीअभावी त्यांचे लसीकरण राहिले आहे.- लसीकरण झालेले नसतानाही चहा-नाश्त्याच्या टपऱ्यांवर कामगार कार्यरत आहेत.