लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘हौसेसमोर पैसे काय चीज’ असे अनेकांकडून बोलले जाते. इतकेच नव्हे तर याबाबतची अनेक उदाहरणेही आहेत. तर आपल्या नवीन वाहनावर आपल्याच आवडीचा क्रमांक राहावा म्हणून अनेकांकडून उपप्रादेशिक परिवहन विभागात जादा शुल्कही अदा केले जाते. मागील दहा महिन्यांत हौसेला मोल नाही, असे म्हणत आपल्या आवडीच्या क्रमांकासाठी ४०९ व्यक्तींनी तब्बल ३३.७७ लाख रुपये आरटीओ कार्यालयात मोजल्याचे वास्तव आहे. व्हीआयपी क्रमांकासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमानुसार जादा शुल्क आकारले जाते. विशेष म्हणजे, वर्धेकरांची ३२३२ हा क्रमांक आपल्या नवीन वाहनावर असावा, अशी इच्छा राहते. काहींना संबंधित क्रमांक मिळाला असला तरी नवीन सिरीज सुरू झाल्यावर तो नंबर कुणाला गेल्यावर काहींची निराशाच होते. अशावेळी इतर दुसऱ्या व्हीआयपी क्रमांकाची निवड वाहन मालकांकडून केली जाते. त्यासाठी जादा पैसेही मोजले जातात. १० महिन्यांत ४०९ व्यक्तींनी जादा पैसे मोजून आपल्या वाहनांसाठी व्हीआयपी क्रमांक घेतला.
सर्वाधिक भाव या नंबरला- ०००१ हा क्रमांक नवीन चारचाकी वाहनासाठी घेतल्यास नियमानुसार तब्बल तीन लाखांचे शुल्क मोजावे लागते.- ०००१ हा क्रमांक नवीन दुचाकी वाहनासाठी घेतल्यास नियमानुसार तब्बल ५० हजारचे शुल्क मोजावे लागते.
आपल्या आवडीच्या क्रमांकासाठी दुचाकीस्वारही आघाडीवर- आपल्या आवडीच्या क्रमांकासाठी केवळ चारचाकी मालकच पसंती दर्शवत नसून यात दुचाकीचालकांचा सर्वाधिक समावेश असल्याचे सांगण्यात आले.- मागील दहा महिन्यांत व्हीआयपी क्रमांक घेणाऱ्यात निम्मेहून अधिक दुचाकीस्वारच असल्याचे सांगण्यात आले.
मागील दहा महिन्यांत एकूण ४०९ व्यक्तींनी आपल्या नवीन वाहनांसाठी आपल्या आवडीच्या क्रमांकाकरिता नियमानुसारच ३३.७७ लाख मोजले आहेत. चारचाकी असो वा दुचाकीस्वारांनी आपल्या आवडीचा नंबरसाठी आमच्या कार्यालयात अर्ज केल्यावर तातडीने कार्यवाही केली जाते.- मो. समीर मो. याकूब, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.