लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा जवळपास महिन्याभरापासून संप सुरू आहे. आता हा संप मिटण्याची काही चिन्हे दिसत नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. यासोबतच बसस्थानक परिसर, स्थानकासमोर व्यवसाय करणारे फेरीवाले, पुस्तक, फळे विक्रेते यासोबतच रिक्षाचालक आदींचा व्यवसाय बुडाल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. त्यानंतर काही ठिकाणी संप मागे घेऊन वाहतूक सुरू केली होती. परंतु नंतर लगेच राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या, अशी मागणी घेऊन पुन्हा संप पुकारला तो आजतागायत सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने वेतनवाढीची घोषणा केली पण, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे प्रवाशांसह बसस्थानकातील प्रवाशांवर अवलंबून असलेल्या लहान व्यावसायिकांचा पोटमारा होत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये होणार असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळांमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहे. पण, बसअभावी फरफट होत आहे.
मुलांची दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यावर असल्याने हे अभ्यासाचे दिवस आहे. सध्या सर्व शाळेत परीक्षा सुरू आहे. परंतु एसटी बंद असल्याने मला दररोज मुलीला दुचाकीने शाळेत सोडावे-आणावे लागते. त्यामुळे माझीही कामाचे नियोजन बिघडले आहे.- मोहन कांबळे, पालक, माठोडा बेनोडा.
मी दररोज एसटीमध्ये चढून बिस्किटे, गोळ्या, खारे दाणे विकायचो. त्यातून मिळणाऱ्या पैशावर आमचा उदरनिर्वाह चालत होता. आता एसटीचा संप सुरू असल्याने बसेस बंद आहे. त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. - बालपांडे, नेत्रहिन फेरीवाला.
बसस्थानकाबाहेर आमचा रिक्षा उभा असतो. बसमधून येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचून दिल्यानंतर आम्हाचा पैसे मिळतात. पण, आता बसेस बंद असल्याने प्रवाशी फिरकतच नाही. त्यामुळे दिवसभर बसून राहावे लागते. आधीच कोरोनाकाळात होतं नव्हतं सारच गेलं. - देवराव, रिक्षाचालक.
आमच्या परीक्षा सुरू आहे. बसेस सुरू नाही खासगी वाहनाने यावे लागते. ते तीन पट प्रवासभाडे घेतात. आमची विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. एसटी नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.- कृतिका सुरेश खरे, विद्यार्थिनी.