वर्धा : पोलिसांनी दारूविक्रेत्यांबरोबच दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली असल्याने आता दारूविक्रेते दारू आणण्यासाठी विविध शक्कल लढवताना दिसून येत आहे. एका दारूविक्रेत्याने चक्क दुचाकीला वेगळा कप्पा करून त्यात दारूच्या बाटल्या टाकून वाहतूक करताना मिळून आला. पोलिसांनी आरोपीस अटक करून दुचाकीसह ५५ हजार २०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई १७ रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या ‘प्राॅपर्टी सेल’ पथकाने यवतमाळ रस्त्यावर नाकाबंदी करून केली.
संगम सुभाष साहू (२५, रा. राजकला रोड, वर्धा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील बार मालकाविरुद्ध सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांची तपासणी, तसेच गस्त घालत असताना त्यांना यवतमाळ जिल्ह्यातून वर्धा शहरात दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी यवतमाळ ते वर्धा रस्त्यावर नाकाबंदी केली असता
एमएच ३१ ईव्ही ३६२७ क्रमांकाची दुचाकी भरधाव येताना दिसली पोलिसांनी दुचाकीला थांबून दुचाकीची पाहणी केली असता काहीही मिळून आले नाही. मात्र, दुचाकीच्या डिक्कीजवळ एक वेगळा कप्पा दिसून आला. पोलिसांनी पेचकसने त्या कप्प्याला लागून असलेले नटबोल्ट काढले असता त्या कप्प्यात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून दुचाकीसह दारूसाठा जप्त करीत सावंगी हद्दीत गुन्हा दाखल केला. त्याने दारूसाठा यवतमाळ जिल्ह्यात कळंब येथून आणल्याने बार मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, पवन पन्नासे, नितीन इटकरे, मिथुन जिचकार यांनी केली.