‘वन वे’ला हरताळ : वाहतूक पोलिसांसमक्ष नियमांची पायमल्ली वर्धा : रस्त्यावर होणारी पार्किंग, प्रवेश बंद असलेल्या मार्गाने होणारी वाहतूक, नो पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने या सर्व प्रकारामुळे शहराची वाहतूक वाहन चालकांकरिता डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्यावर होत असलेल्या पार्किंगमुळे वेळोवेळी होणारा जाम शहरातील वाहतुकीची व्यथा सांगून जात आहे.वाहनतळ नसलेले शहर म्हणून वर्धा शहराची ओळख आहे. या शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळण्याकरिता वाहतूक शाखेत एका पोलीस निरीक्षकासह एकूण ५१ कर्मचारी कार्यरत आहेत. या ५१ कर्मचाऱ्यांकडून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम केले जाते. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या कामासह नागरिकांना वाहतुकीचे नियम सांगणे व नियम तोडणाऱ्यांना दंड आकारण्याचे कामही या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. यामुळे रस्त्यावर कार्यरत असलेले हे कर्मचारी वाहतूक नियमांची माहिती देण्यापेक्षा नियम तोडणाऱ्यांना दंड आकारण्यातच अधिक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)‘वन वे’ नावालाच बाजार परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतूक शाखेच्यावतीने काही रस्ते ‘वन वे’ करण्यात आले होते; मात्र या ‘वन वे’चा विसर वाहतूक पोलिसांनाच पडल्याचे दिसते. या मार्गाने अनेक वाहन चालक जात आहेत. यामुळे बाजार परिसरातील कोंडी अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. बाजार परिसरातील वाहतूक व्यवस्था सांभाळण्याकरिता एकूण पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील तीन कर्मचारी पार्किंगची व्यवस्था तर दोन पोलीस पेट्रोलिंग सांभाळत असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी बाजार परिसरात सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघण होत असल्याचे ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था मोडकळीस आली आहे.
शहरात वाहतुकीची डोकेदुखी
By admin | Published: January 01, 2015 11:05 PM