सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण, मध्येच पावसाच्या सरी कोसळत असल्याने साथीच्या विविध आजारांनी हातपाय पसरल्याचे चित्र आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात डेंग्यूचे तब्बल १५३ रुग्ण आढळले. पाचपेक्षा अधिक रुग्णांचा डेंग्यूने मृत्यूही झाला असताना ‘आॅडिट’अभावी आरोग्य विभागाकडून डेंग्यूने केवळ एकाचाच मृत्यू झाल्याचा दावा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.यंदा पाऊस उशिरापर्यंत लांबला. त्यानंतरही वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मध्यंतरीच्या काळात अनेक ठिकाणी पाऊसही झाला. त्यामुळे साथीच्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये आणि खासगी रुग्णांमध्ये डेंग्यूसह विविध आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार घेत असल्याने सर्व हाऊसफुल्ल आहेत. बालरोगतज्ज्ञांकडेही रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, आरोग्य विभाग केवळ जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय सुरू असल्याचा कांगावा करीत आहे. तापाचे रुग्ण आढळले त्या भागात धूरळणी केली जात असल्याचे या विभागाकडून सांगितले जात आहे. शहरालगतच्या बहुतांश भागात सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही. खुल्या भूखंडांना कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळ्यापासून विविध ठिकाणी साचलेल्या पाण्याचे डबके आता डासांचा अड्डाच झाले आहेत. या सर्वांमुळे डेंग्यूच्या डासअळी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरालगतच्या साईनगरात एक घराआड डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. दिवाळीपूर्वी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नाममात्र धूरळणी करून देखावा केला. आता यालाही ब्रेक लागल्याचे अनेक नागरिक सांगतात. संपूर्ण जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात डेंग्यूमुळे एकच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यालाही दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना आरोग्य विभागाचे डेंग्यू व साथीच्या आजारांचे अद्याप आॅडिट झालेले नाही.साईनगराला डेंग्यूचा डंखशहरातील साईनगर परिसरात ऑगस्ट महिन्यात डेंग्यूने मोठे थैमान घातले. एक घराआड रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. या कालावधीत येथे डेंग्यूचे दहावर रुग्ण आढळून आलेत. असे असताना नगरपालिका, जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. काल-परवा डेंग्यूने जिनेवार नामक बँक व्यवस्थापकाचा बळी घेतला. यानंतर आरोग्य विभागाची चमू साईनगरात पोहोचल्याचे नागरिकांनी सांगितले.जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वातील समितीतील तज्ज्ञांमार्फत ऑडिट झाल्याशिवाय डेंग्यूने मृत्यू झाल्याचा आकडा निश्चित करता येत नाही. ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सध्यातरी संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूने मृत्यूची संख्या केवळ एकच आहे.- लक्षदीप पारेकरजिल्हा हिवताप अधिकारी, वर्धाप्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नगरपालिका व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी बैठकीत डेंग्यू व साथीच्या आजारांविषयी आढावा घेणार आहेत. विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच प्रभावीरीत्या जनजागृती केली जात आहे.- डॉ. अजय डवलेजिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा
आरोग्य विभागाच्या लेखी डेंग्यूने एकच मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 6:00 AM
यंदा पाऊस उशिरापर्यंत लांबला. त्यानंतरही वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मध्यंतरीच्या काळात अनेक ठिकाणी पाऊसही झाला. त्यामुळे साथीच्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात आठ महिन्यांत आढळले तब्बल १५३ रुग्ण