चैतन्य जोशी
वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणात आरोपी डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांच्या पोलीस कोठडीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून आता आर्वी पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयातील विविध वॉर्डात वितरित होणाऱ्या औषधांच्या रजिस्टरची तपासणी करून अंदाजे ४ रजिस्टर सील केले आहे. रजिस्टरमध्ये खोडतोड झाल्याचे लक्षात आल्याचे दिसून आल्याने आता आरोग्य विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाची ही भूमिका ‘कदम’ रुग्णालयाला वाचविण्यासाठी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आर्वी येथील ‘कदम’ रुग्णालयात अल्पवयीन मुलीचे गर्भपात प्रकरणात मुदतबाह्य शासकीय औषधांचे भांडार सापडले होते. याबाबत आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी आर्वी पोलिसात औषधांचा अपहार झाल्याची तक्रार दाखल केली होती. याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके करीत असतानाच त्यांनी डॉ. रेखा कदम आणि डाॅ. नीरज कदम यांना प्राेडक्शन वॉरंटवर पुन्हा पोलीस कोठडीत घेतले. पोलीस कोठडी दरम्यान दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयातील विविध वॉर्डात वितरित होणाऱ्या औषधांच्या रजिस्टरची तपासणी केली असता काही रजिस्टरमध्ये खोडतोड झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी संशयास्पद वाटणारे ४ रजिस्टर जप्त करीत सील केले. त्यामुळे आरोग्य विभागाची भूमिका पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणात उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘त्या’ १३ प्रश्नांवर ‘सीएस’ अजूनही निरुत्तरच
‘कदम’ रुग्णालयाच्या तपासणीदरम्यान आर्वी पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचीन तडस यांना सुमारे १३ प्रश्नांबाबत पत्रातून माहिती मागितली होती. मात्र, या पत्रव्यवहाराला तब्बल महिनाभराचा कालावधी उलटला असून अद्याप पोलिसांना माहिती देण्यात आलेली नसल्याने त्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे दिसते.
पत्रांत विचारली ही माहिती...
सन २०१७ ते २०१८ या कालावधीत कदम रुग्णालयाचे वार्षिक निरीक्षण झाले आहे की नाही, याबाबत माहिती द्यावी. कदम रुग्णालयात नर्सिंग होम, सोनोग्राफी केंद्र तसेच गर्भपात केंद्र असल्याने संचालकाजवळ यातील कुठले रेकॉर्ड रजिस्टर उपलब्ध आहेत, बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार कदम रुग्णालयाने जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे कोणकोणते प्रमाणपत्र जमा केले आहेत, याबाबतची माहिती मागविण्यात आली असली तरी अद्याप आरोग्य विभागाने कुठलीही माहिती पोलिसांना दिलेली नसल्याची विश्वसनीय माहिती आहे.