पाण्याची टाकी ओव्हरफ्लो : बोरगाव (मेघे) येथील नागरिक त्रस्तवर्धा : सध्या पावसाळा सुरू असल्याने डबके साचल्यास डास व दुर्गंधीमुळे आरोग्याला धोका असतो. यामुळे परिसर स्वच्छ व कोरडा ठेवणे गरजेचे असते; पण पाण्याची टाकी ओव्हर फ्लो होऊन डबके साचत असल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. शिवाय घाणीमुळे दुर्गंधी पसरल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत सोमवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांना निवेदनही देण्यात आले.गणेशनगर बोरगाव (मेघे) येथील पाण्याच्या टाकी परिसरातील महिला, पुरूष आपल्या चिमुकल्यांसह जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात पोहोचले. पाण्याची टाकी सतत ओव्हरफ्लो होत असल्याने परिसरात डबके साचले आहे. या पाण्यात डासांची पैदास वाढली असून दुर्गंधी पसरली आहे. साचलेल्या पाण्यात डुकरांचा हैदोस वाढला आहे. परिणामी, लहान मुलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे. दुर्गंधीमुळे रस्त्याने ये-जा करणेही कठीण झाले आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी कच्च्या नाल्यांची निर्मिती करणे गरजेचे झाले आहे. परिसरात नाल्या नसल्याने प्रत्येक घरासमोर व रस्त्यावर डबके साचले आहे. या समस्यांची दखल घेत परिसर स्वच्छ करावा, साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करावी, घाणीचे साम्राज्य दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. यावर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी दखल घेत संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना आदेश दिले. निवेदन देताना जुनघरे, दरणे, चौरागडे, भोयर, चौधरी, ग्रा.पं. सदस्य नितीन डफळे, नागरिक शंकर वैद्य, जानराव ठोंबरे, सुधाकर भोयर, कदम, अमोल भगत, रोशन दाभाडे, प्रमोद गिरी, दाभाडे, निकुळे, कडू आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
डबक्यांमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Published: July 26, 2016 1:48 AM