प्रशिक्षण कार्यक्रम : शाळांच्या धर्तीवर उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आरोग्य विभाग वर्धा, सलाम फाउंडेशन, मुंबई आणि बजाज फाउंडेशन यांच्यावतीने कार्यशाळा घेण्यात आली. यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. तंबाखुमुक्त शाळेच्या धर्तीवर आरोग्य संस्था व शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, दंत चिकित्सक डॉ. कोडापे, हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, डॉ. गहलोत, डॉ. रेवतकर यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. चव्हाण प्रशिक्षणार्थींना म्हणाले, तंबाखूमुक्त शाळानंतर आता वर्धा जिल्ह्यातील आरोग्य संस्था आणि शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. तर डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी तंबाखूमुक्तीत समुपदेशनाचे महत्त्व व्यक्त केले. सलाम फाउंडेशनच्या लाईफ फर्स्ट या तंबाखूमुक्ती योजनेअंतर्गत डॉ. हिमांशु गुप्ते, डॉ. वैभव थावल, गौरी मंडळ यांनी व्यसनमुक्तीवर उपस्थितांना प्रशिक्षण दिले. तंबाखूमुक्तीत समुपदेशनाचे महत्त्व, प्रक्रिया, त्याचे डॉक्युमेंटेशन याबाबत सविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असे ४५ अधिकारी सहभागी होते. प्रशिक्षणात सहभागी अधिकारी त्यांच्या अधिनस्थ कर्मचारी वर्गाला सदर प्रशिक्षण देऊन तंबाखूमुक्तीचा लढा अजून तीव्र करणार, असा निर्धार केला. ग्रामीण भागात अधिकाधिक व्यक्तींना व्यसनमुक्तीवर समुपदेशन करुन अधिकाधिक लोक व्यसनमुक्त होतील, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
आरोग्य संस्था आणि शासकीय कार्यालय होणार तंबाखूमुक्त
By admin | Published: June 07, 2017 12:41 AM