वर्धा : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अवैधपणे उत्खनन करीत मुरूम व मातीची चोरी केल्याची तक्रार कोझी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी सेलू पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्सचे व्यवस्थापक अनिल कुमार बच्चूसिंग आणि उपकंत्राटदार एम. पी. कन्स्ट्रक्शनचे आशिष दफ्तरी यांनी अर्ज सादर केला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार होती; पण ही सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता बुधवारी, ११ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.अॅफकॉन्सच्या अधिकाऱ्यांच्या अटकपूर्व जामिनावर यापूर्वी ३१ आॅगस्टला सुनावणी झाली होती. त्या वेळी न्या. नरेश सातपुते यांनी उपकंत्राटदार आणि आरोपी असलेल्या आशिष दफ्तरी यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणीसाठी ३ सप्टेंबरला वेळ दिला असल्याने ही दोन्ही प्रकरणे पटलावर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही दोन्ही प्रकरणे मंगळवारी न्यायालयात ठेवण्यात आली. परंतु सुनावणी झाली नाही.
विशेष म्हणजे, सेलू पोलिसांनी अनिल कुमार बच्चूसिंग आणि आशिष दफ्तरी यांना अटकपूर्व जामीन का देऊ नये, याविषयीचा अभिप्राय न्यायालयात सादर केला आहे.रस्त्यावरील खड्डे अॅफकॉन्सने मुरूम टाकून बुजविलेसमृद्धी महामार्गासाठी अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरची शेकडो अवजड वाहने सेलू-कोटंबा व धानोली मार्गावरून सतत धावत असल्याने डांबरी रस्त्यांची वाट लागली. त्यामुळे कोटंबा गावात येणारी एसटी चार-पाच दिवसांपासून बंद झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ला प्रकाशित होताच खळबळ उडाली. ‘लोकमत’ने अॅफकॉन्सला दणका देताच सोमवारी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. कोटंबा व धानोलीच्या नागरिकांनी लोकमतचे अभिनंदन केले आहे.