वर्धा : गांधीनगरकडे पायदळ जात असलेल्या महिलेला मागाहून भरधाव आलेल्या दुचाकीने जबर धडक दिली. या धडकेत महिलेचे दोन्ही पाय मोडले. हा अपघात बॅचलर रस्त्यावर असलेल्या बजाज फायनान्स कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर झाला. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी दुचाकीवरील दोघांना अटक केली.
विशेष म्हणजे बॅचलर रोडवर असलेल्या डागा हॉस्पिटलसमोरील परिसरात तसेच रस्त्यालगत टवाळखोर रात्रीच्या सुमारास ठाण मांडून बसतात. त्यातील काही युवक हे मद्यपान करीत पानटपऱ्यांवर बसतात. तर काही युवकांकडून भरधाव दुचाकी चालविण्याचे प्रकार दररोज नागरिक डोळ्याने पाहतात. मात्र, पोलिसांचे याकडे होणारे दुर्लक्ष विविध प्रश्न उपस्थित करुन जातात.
जया आंबटकर या सायंकाळच्या सुमारास गांधीनगर परिसरात असलेल्या त्यांच्या सासुरवाडीकडे पायदळ जात होत्या. दरम्यान, मागाहून भरधाव येणाऱ्या एम.एच. ३२ यू. ५७०३ क्रमांकाच्या चालकाने निष्काळजीपणे दुचाकी चालवून जया यांना जबर धडक दिली. या धडकेत जया जमिनीवर पडल्या. तसेच त्यांना दुभाजकाचाही मार लागला. दुचाकीचालक एवढ्यावरच थांबला नसून पुन्हा त्यांच्या पायावरून दुचाकी नेली. या अपघातात जया यांचे दोन्ही पाय मोडले.
याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आकाश सुरेश राऊत रा. गाडगेनगर म्हसाळा आणि अंकित नंदू जुनघरे रा. म्हसाळा यांना अटक केली होती. मात्र, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली.