लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. यामुळे भूगर्भासह नद्या व नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी जिल्ह्यातील तब्बल १९ महसूल मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस म्हणजेचे अतिवृष्टी झाल्याने उभ्या पिकांचा चांगलाच फटका बसला आहे. ५ जुलैला जिल्ह्यात रात्रभर पाऊस कोसळला होता. त्यावेळी जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. त्या संकटातून वर्धेकर सावरत नाहीच तो आता शनिवारी कोसळलेल्या पावसाने अनेकांचे कंबरडेच मोडले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पातील जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याने या प्रकल्पाचे सात दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पातून वर्धा नदीच्या पात्रात १८६.६० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
२१६ घरांचे नुकसान
- शनिवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला; पण याच मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २१६ घरांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. हा प्राथमिक अंदाज असून, सर्वेक्षणाअंती नेमके किती नुकसान झाले यवची इत्थंभूत माहिती पुढे येणार आहे.
अंकुरलेले पीक पाण्याखाली
- मुसळधार पावसामुळे नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. नदी व नाल्याच्या पुरामुळे नदी आणि नाल्यांच्या काठांवरील अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले असून, काही शेतांना तळ्याचेच स्वरूप आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. सध्या सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सर्वेक्षणाअंती नुकसानीची संपूर्ण माहिती पुढे येणार आहे.