पवनार : मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे. रोहणी नक्षत्रामध्येही पाऊस येत असल्याने वाहितीची कामे पूर्ण करून शेतकरी मृग नक्षत्रात पेरणी आटोपत होते; पण यावर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे विदर्भात मान्सूनच आला नाही़ मागील वर्षी अतिवृष्टी, गारपीट आणि यंदा कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी भरडून निघत आहे़ गत मंगळवारी अकाली पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी घाईने बियाण्यांची पेरणी केली़ आज-उद्या पाऊस येईल, या आशेने सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण पावसाने दडी मारल्याने बियाणे जमिनीतच नष्ट झाले़ काहींनी तर धूळपेरणी केली होती़ त्यांच्याही बियाण्यांचे अंकूर जमिनीतच वाळले़ काहीच पाऊस आला नसता तर धूळपेरणीही वाचली नसती़ ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांच्या मानगुटीवर भारनियमनाचे भूत आहे़ शेतीसाठी सुमारे १६ तासाचे भारनियमन असून रात्री-अपरात्री कधीही वीज पुरवठा खंडित केला जातो़ यामुळे शेतकऱ्यांना रात्र शेतातच काढावी लागते. जिल्ह्यात सर्वत्र हिच स्थिती आहे. आधी अतिवृष्टी, मग गारपीट व आता कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे़ बियाणे व खताकरिता त्याची बरीच रक्कम खर्च झाली आहे. आता दुबार पेरणी करावीच लागणार असल्याने पुन्हा बियाणे व खताचा खर्च येणार आहे़ सोबत भरमसाठ वाढलेला मजुरीचाही खर्च करावा लागणार आहे़ साठेबाजांमुळे कांद्याचे भाव वाढले तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविणारे हे सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसतील काय, याबाबत शंकाच आहे़ तीन-चार वर्षांपासून नापिकीचा सामना करणारा शेतकरी धैर्याने उभा आहे़ काहींनी आत्महत्या केल्या असतील; पण इतर शेतकरी संकटाला तोंड देत आहे़ आता मात्र सहनशीला संपत असून हाती पैसा नाही, बाजारात कुणी उधार देत नाही, शेती कशी करावी, हा यक्ष प्रश्न आहे़ लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात, हवामान खाते खरी माहिती देत नसल्याने शेतकरी पूरता गारद झाल्याचे चित्र आहे़(वार्ताहर)
अतिवृष्टी, गारपीट आणि आता कोरडा दुष्काळ
By admin | Published: June 25, 2014 12:36 AM