वर्धा : जून महिन्यात वर्धावासीयांना हुलकावणी देणारा पाऊस जुलै महिन्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यांत संततधार कोसळला. अशातच एकूण ४० महसूल मंडळांपैकी एका मंडळात तब्बल तीन वेळा, पाच मंडळांत दोन वेळा, तर २० मंडळांत एक वेळा ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवले. याच पूरस्थितीच्या संकटाचा तीन राज्य मार्ग, तर चार प्रमुख जिल्हा मार्गांना चांगलाच फटका बसला आहे.
सातही मार्गांवर तब्बल ३७ ठिकाणी दुरुस्तीचे काम करावे लागत असून, तात्पुरत्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरूही करण्यात आले आहे. एकूणच अतिवृष्टी अन् ढगफुटीसदृश पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे टेन्शन वाढविले असून, कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी निधीची मागणी शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. विशेष म्हणजे मागील मागणी केलेला निधी अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झालेला नाही. तर यंदा शासन वेळीच निधी उपलब्ध करून देईल काय, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.तात्पूर्त्या दुरुस्तीसाठी हवे ११.६६ कोटी
अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते, पूल, मोरी आदींची तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला ११.६६ कोटींचा निधीची गरज आहे. त्याबाबतचा निधी मागणी प्रस्ताव वरिष्ठांच्या मार्गदर्शनात शासनाला पाठविण्यात आला आहे.कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी हवे १५८.४३ कोटी
जुलै महिन्यांत जिल्ह्यात पावसाने कोसळधार जोर कायम ठेवल्याने तब्बल सात प्रमुख मार्गांना चांगलाच फटका बसला. याच मार्गांवर ३७ ठिकाणी दुरुस्तीचे काम करावे लागणार असून तात्पुरत्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. पण, कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी १५८.४३ कोटींची गरज असून त्याबाबतचा निधी मागणी प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शासनाकडे पाठविण्यात आला आहे.किती मंडळांत किती वेळा ढगफुटीसदृश पाऊस?
एक वेळा : २०दोन वेळा : ०५
तीन वेळा : ०१अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसामुळे वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते, पूल व मोरी क्षतिग्रस्त झाल्याने ३७ ठिकाणच्या तात्पुरती दुरुस्तीसाठी ११.६६ कोटी, तर कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी १५८.४३ कोटींच्या निधीची गरज आहे. त्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे.
- सतीश अंभोरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.