देउरवाडा(आर्वी) : आर्वी तालुक्यात सतत दहा तास आलेल्या पावसाने तब्बल सहा मंडळातील ५४ गावांना पावसाचा फटका बसला असून २६५ बाधित कुटुंबाची संख्या आहे. यातील ११० घरात पाणी साचून कपडे, धान्य संसार उपयोगी वस्तूचे पूर्णतः नुकसान झाले आहे तर ३५ अंशतः घरे पडली असून आठ गाई म्हशीच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. तर ९९६ हेक्टर आर मधील शेती पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी दिली
आर्वी परिसरात अतिवृष्टीची तहसीलदार विद्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार विनायक मगर व महसूल विभागाने मंगळवारी तारीख पाचला दिवसभर पाहणी करून भेटी दिल्या. आर्वी परिसरात १४ गावाला पावसाचा फटका बसला तर बाधित कुटुंबाची संख्या सहा आहे. आठ घरे आणि एक गोठा पावसाने पडला तर ३२९ हेक्टर मध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. वाठोडा सर्कलमध्ये २० गावातील ९४ कुटुंब बाधित झाली आहे. दहा घरे आणि सात गोठे अतिवृष्टीने पडले असून ४३० हेक्टरमध्ये शेतीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. वाथोडा परिसरात तीन गावातील ४५ कुटुंब पावसाने बाधित आहे तर चार घरांचे अंशतः नुकसान असून ४० हेक्टर शेती खराब झाली आहे.
विरुळ क्षेत्रात चार गावांना पावसाचा फटका बसला असून ११० कुटुंब बाधित आहे. तीन घरे अंशतः नुकसान झाले आहे तर ११५ हेक्टर मधील पिके खराब झाली आहे. रोहणा सर्कलमध्ये अति पावसाचा १२ गावांना फटका बसला, यात ९ कुटुंब बाधित झाली असून नऊ घरांचे अंशता नुकसान झाले आहे. ८२ हेक्टर मधील पिके खराब झाली आहे. खरांगणा सर्कल मध्ये एक गाव एक घर बाधित आहे. एका घराचे अंशतः नुकसान झाले आहे. मात्र शेती पिकाचे नुकसान नाही.
नुकसानग्रस्त शेतीची आणि घराची प्रत्यक्ष पाहणी महसूल विभागामार्फत सुरू असून सर्व्हे झाल्यावर त्याचा अंतिम अहवाल मदतीसाठी वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. एकूणच नैसर्गिक आपत्तीमुळे आर्वी तालुक्यात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसासच उघड्यावर आले आहेत.