लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवारी सकाळी ढगाळी वातावरण असतानाच, दुपारी अचानक वातावरणात बदल होत, वर्धा शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे वर्धा शहरातील छोटे, मध्यम व मोठ्या नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. अशातच काही भागांत पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रामनगर जैन मंदिर परिसर, हिंदनगर, गौरक्षण वॉर्ड, मालगुजारीपुरा, भामटीपुरा, स्टेशनफैल, बॅचलर रोड, कृष्णनगर, पोद्दार बगीचा, म्हाडा कॉलनी आदी भागातील तब्बल ३२८ व्यक्तींच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत पावसाचे पाणी शिरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. बांधकाम साहित्य टाकून विविध भागांतील नाल्याच बुजविण्यात आल्याने आणि त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे सफसेल दुर्लक्ष राहिल्याने, पावसाचे पाणी नाल्यांनी न वाहून जाता, थेट नागरिकांच्या घर व व्यावसायिक प्रतिष्ठानांत शिरल्याचा आरोप नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.
जनजीवन विस्कळीत : अन्नधान्याची नासाडी- शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरात चांगलाच कहर केला. अशातच नगरपालिकेचा दुर्लक्षितपणाही चव्हाट्यावर आला असून अनेकांच्या घरात नालीतील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे पालिकेने याची गंभीर दखल घेण्याची नितांत गरज आहे. शहरातील जुन्या आरटीओ कार्यालयामागील राधानगर परिसरातील रहिवासी आशा काकडे यांच्या घरात सुमारे तीन ते चार फूट पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनावश्यक साहित्याची नासाडी झाली. नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामात हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असून याचा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागल्याचे दिसून येत आहे. परिसरातील नालीची साफसफाई न केल्याने तसेच त्या नालीचा प्रवाह मोकळा न केल्याने नालीतील पावसाचे पाणी वाहून न जाता नागरिकांच्या घरात शिरत आहे. याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.