दारोडा (वर्धा) : शासकीय काम बारा महिने थांब याची प्रचिती अनेकदा अनेकांना येते. पण जीवंत शेतकऱ्याला मयत दाखवून चक्क पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावात उघडकीस आला आहे.
संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे तीन हप्ते जमा झाले. पण त्यानंतर शासकीय मदत का मिळाली नाही याची विचारणा करण्यासाठी शेतकरी संबंधिताकडे गेला असता तुमचा तर मृत्यू झाला. त्यामुळेच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने अहो मी अजूनही जिवंत आहे हे पटवून देण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. चुकी शासकीय कर्मचाऱ्याची आणि शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आपल्याला पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी हवालदील शेतकरी रामसिंग हिरासिंग गहेरवार यांनी केली आहे.
गहेरवार यांच्याकडे वडिलोपार्जित १.११ हे. आर. शेतजमीनदारोडा येथील शेतकरी रामसिंग हिरासिंग गहेरवार यांची शेतजमीन दारोडा शिवारात असून ते याच वडिलोपार्जित शेतजमीन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना ९ मार्च २०२० ला पीएम किसान योजनेचा पहिला, १५ एप्रिल २०२० ला दुसरा तर ९ ऑगस्ट २०२० ला तिसरा हप्ता मिळाला. पण मयत दर्शवित त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देणे बंद करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित संबंधिताला विचारणा केल्यावर आपल्याला जिवंतपणीच मृत घोषित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली.तहसीलदारांनीही उडविली थट्टासंबंधित गंभीर बाब शेतकरी गहरवार यांच्या लक्षात येताच त्यांनी हिंगणघाट येथील तहसील कार्यालय गाठून त्याबाबतची माहिती तहसीलदारांना दिली. पण तहसीलदारांनीही उडवा-उडवीचे उत्तर दिल्याने हवालदील शेतकरी रामसिंग गहरवार यांनी आ. समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयाची पायरी चढली. आमदारांना आपबीती सांगितली. तेव्हा तू काळजी करू नकोस, तू तहसीलदाराकडे पुन्हा जा, तूझे काम होईल असे सांगितल्याने शेतकरी पुन्हा तहसीलदारांकडे आला. तेव्हा तू आमदार साहेबांकडून आला. तेव्हा तू जिवंत होतेच, काळजी करू नको असे म्हणत हवालदील शेतकऱ्याची थट्टाच केली. तालुका कचेरी ते आमदार आणि पुन्हा तालुका कचेरी अशी पायपीट करूनही समस्या निकाली निघाली नसल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.