गावात दहशत : घरातून बकरी ओढत नेली समुद्रपूर : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गोविंदपूर शिवारात बिबट्याने चांगलीच दहशत माजविली आहे. गुरुवारी रात्री बिबट्याने गावातून बकरी ओढत नेल्याने गावकऱ्यांत चांगलीच दहशत पसरली आहे. यामुळे वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. गोविंदपूर हे गाव वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेवर आहे. गोविंदपूरसह गत १०-१५ दिवसांपासून नारायणपूर, गोविंदपूर, बल्लारपूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची माहिती होती. याच काळात नारायणपूर येथील दिनेश वैद्य यांच्या शेतात येत बिबट्याने गाय ठार केली होती. यावर वनविभागाने कोणतीही कारवाई केली नाही. अशातच गुरुवारी रात्री गोविंदपूर येथील लाहोटी यांच्या शेतामध्ये अशोक वाहदुडे, अजाब वैद्य यांना बिबट्या आढळून आला. तर रात्रीला गोविंदपूर येथील नाल्याच्या काठावर असलेल्या कमला पारखी यांच्या घराच्या दारात बांधलेली बकरी शेजारच्या शेतामध्ये ओढत नेऊन ठार केली. या बकरीचे अवशेष गावकऱ्यांना शेजारच्या शेतात आढळून आले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली असून शेतकरी शेतात जाण्यासाठी धास्तावून आहेत. या दहशतीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतीच्या पिकाचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांची या बिबट्याने शिकार केली त्यांना तत्काळ शासकीय मदत देण्याची मागणी गावकऱ्यांची आहे. तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गोविंदपूरच्या सरपंच शारदा तुमडाम यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी) शेतकऱ्यांत धास्ती घराच्या दारात बांधून असलेली बकरी बिबट्याने ओढत नेली. यामुळे गावात दहशत पसरली आहे. या गावातील अनेकांच्या शेतातील उत्पन्न निघण्याची ही वेळ आहे; परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास भीत असून त्यांचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती आहे.
गोविंदपूर परिसरात बिबट्याचा हैदोस
By admin | Published: March 11, 2017 12:35 AM