‘जैसे थे’चा आदेश : सदर शिक्षकांच्या समायोजनाला लागला ‘ब्रेक’ वर्धा : येथील यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेंतर्गत जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांपैकी १३ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यांची नियुक्ती नियमानुसार व आरक्षणानानुसार असल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी सदर शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये, असा निर्णय दिल्याने या १३ शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारा संचालित शाळांतून बरेच शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले होते. यात संदीप चवरे, गजानन चौधरी, प्रतिभा खडगी, संदीप काळे, आशा मेश्राम, नविन बोडाले, प्रकाश तळवेकर, संजय चवरे, माला राऊत, वैशाली राऊत, गणेश मानकर, सुषमा नंदनवार व कविता डेकाटे या शिक्षकांचा समावेश होता. अतिरिक्त ठरलेले शिक्षक हे पदवीधर बी.एड., डी.एड व ए.टी.डी. पात्रताधारक आहे. संस्थेमध्ये पदोन्नती दिल्यामुळे पदवीधर बी.एड.च्या जागा रिक्त ठरत असल्यामुळे सदर शिक्षक अतिरिक्त ठरत नाही. हे ज्येष्ठ शिक्षक असताना कनिष्ठ शिक्षक सेवेत ठेवण्यात आल्यामुळे तसेच याचिकाकर्ते हे आरक्षणाच्या नियमानुसार अतिरिक्त ठरत नसल्यामुळे त्यांनी अतिरिक्त ठरविणाऱ्या आदेशाला उच्च न्यायालयात आवाहन दिले. त्यांनी अॅड. संजय घुडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर १९ डिसेंबर रोजी न्यायमूर्तींनी जैसे थे चा आदेश दिला. सदर आदेशापूर्वी उच्च न्यायालयाने शिक्षण सचिव, शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. वर्धा व अध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा यांना नोटीस जारी केले होते.(प्रतिनिधी)
यशवंतच्या १३ अतिरिक्त शिक्षकांना उच्च न्यायालयाचा दिलासा
By admin | Published: December 23, 2016 1:45 AM