वर्धा : मी तुझ्यावर प्रेम करतो... तू मला खूप आवडते... मला तुझ्याशी लग्न करावयाचे आहे... असे म्हणत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल वर्धा येथील जिल्हा न्यायाधीश-२ तथा अति सत्र न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी गुरुवारी दिला. रोशन दशरत काचनकुरे, रा. वायफड, ता. वर्धा, असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.
वर्धा येथील जिल्हा न्यायाधीश-२ तथा अति सत्र न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी आरोपी रोशन दशरत काचनकुरे याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ नुसार दहा वर्षांचा सश्रम कारावास व सात हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावसाची शिक्षा ठोठावली. शिवाय दंडाच्या रक्कमेपैकी पाच हजार रुपये पीडितला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशित केले.
पीडिता आणि आरोपी हे दोघे एकाच घरी टीव्ही बघण्यासाठी जायचे. त्यामुळे त्याची पीडितेसाेबत ओळख झाली. याच ओळखीचा फायदा घेत आरोपी रोशन कावनकुरे याने पीडितेला मी तुझ्यावर प्रेम करतो... तू मला खूप आवडते... मला तुझ्याशी लग्न करावयाचे आहे... असे म्हणून तिला प्रेम जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने एक दिवस पीडितेला त्याच्या गाडीवर बसून नेत वायफड शिवारातील एका शेतात रात्रभर तिच्यावर जबरी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. शिवाय तिला तेथेच सोडून पोबारा केला.
घाबरलेल्या पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिल्यावर पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण करून उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद व पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश अदोणे यांनी आरोपीस शिक्षा ठाेठावली. शासकीय बाजू ॲड. गिरीश व्ही. तकवाले यांनी मांडली.
१२ साक्षदारांची तपासली साक्ष
या प्रकरणात एकूण १२ साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. साक्षदाराची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद तसेच डी. एन. ए. रिपोर्ट तसेच वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.
अन् पीडिताच झाली फितूर
पुरावा दरम्यान पीडित मुलगी ही फितूर झाली. तिने आरोपीविरुद्ध साक्षेत काहीही सांगितले नाही. परंतु, चौकशी दरम्यान पीडित व आरोपी यांचे कपडे जप्त करण्यात आले होते. याच कपड्यांवर काही ठिकाणी रक्ताचे व विर्याचे डाग होते असे डी. एन. ए. अहवालात सिद्ध झाले. तसेच तक्रारीनंतर पीडितेचा वैद्यकीय अहवाल हा देखील पीडितावर बलात्कार झाला असा प्राप्त झाला. त्यामुळेच जरी पीडिता ही फितूर झाली असली तरी इतर साक्ष-पुराव्यांच्या आधारे आरोपीला न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावली.