वर्धा : गत ३५ वर्षांपासून आर्वी नाका परिसरात वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टीधारकांना जागा सोडण्याकरिता धमकावणी केली जात आहे. बिल्डर लॉबीकडून रहिवाश्यांना धमक्या देणे सुरू असून येथे अद्याप कोणत्याच सुविधा देण्यात आल्या नाही. यासह आदी समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता वडार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. तसेच प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले.वडार समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असून प्रशासनाने त्यांना अजूनही कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत. येथील रहिवाश्यांकडे शिधापत्रिका नाही. येथील रहिवासी मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह करतात. शिधापत्रिका नसल्याने त्यांना शासकीय सुविधा मिळत नाही. या झोपडपट्टीत परिसरात मूलभूत सोयी सुविधा देण्यात आल्या नाही. येथे वास्तव करणाऱ्यात बहुतांश भटक्या समाजातील लोक आहेत. खोदकाम, दगड फोडणे, बांधकाम इत्यादी कामे करून ते जीवन जगत आहे. येथील युवापिढीच्या हाताला काम नसल्याने विघातक कामांत गुंतण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील युुवकांकरिता एखादा प्रकल्प तयार करुन रोजगार उपलब्ध करुण देण्याची मागणी केली. ज्या जागेवर ही झोपडपट्टी आहे ती जागा मोक्याची असल्याने आता बिल्डर लॉबीकडून नागरिकांना धमकाविण्याचे प्रकार सुरु आहे. जागा सोडा नाही तर जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. यावेळी शिष्टमंडळात मनोहर पंचारिया, प्रा. शिवाजी इथापे, नागोराव पवार, नत्थू हराळे यांचा सहभाग होता. मोर्चात सुकू कुराई, रेणूका मुळे, मुक्ता सातपुते, सुशीला देवगण, सुरेखा कुराई, अनिता इडकर, सुनीता कुराडे, मंगला जाधव, कांता कोरे, कविता गायकवाड, चंद्रकला मुळे, जमुना जाधव, शीला इटनकर, ललिता कुराडे, नंदा पवार आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)
वडार झोपडपट्टीत समस्यांचा डोंगर
By admin | Published: October 11, 2014 2:05 AM