नरेश डोंगरे -
हिंगणघाट (जि. वर्धा) : प्रा. अंकिता पिसुड्डेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत पेटवणारा क्रूरकर्मा विकी उर्फ विकेश नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचे कळताच जमलेल्या नागरिकांनी त्यांच्या भावनांना घोषणेच्या रूपाने वाट मोकळी करून देत मृत अंकिताला श्रद्धांजली वाहिली. नगराळेने ३ फेब्रुवारी २०२० ला अंकितावर पेट्रोल टाकून तिला पेटवले होते. १० फेब्रुवारीला अंकिताचा मृत्यू झाला आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास केला. हिंगणघाट न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर ९ फेब्रुवारीला न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते.
सायंकाळी ५ वाजता निकालगुरुवारी दुपारी ११ वाजता कडक बंदोबस्तात आरोपी विकेश याला न्यायालयात आणण्यात आले. त्याचवेळी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम पोहोचले. ११.१५ वाजता न्या. राहुल भागवत न्यायासनावर स्थानापन्न झाल्यानंतर कोर्टाचे कामकाज सुरू झाले. ॲड. निकम यांनी ३६ मिनिटांचा युक्तिवाद करताना विविध प्रकरणांचे अनेक दाखले देत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. तर बचाव पक्षाचे वकील ॲड. भूपेंद्र सोने यांनी आरोपीला कमीतकमी शिक्षा व्हावी, अशी विनंती केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सायंकाळी ५ वाजता आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ॲड. निकम यांनी मांडलेले मुद्दे -- हे क्रौर्य दुर्मीळ. म्हणून त्याला मृत्युदंड द्या.- ‘तू मेरी नही तो किसी की नही’, ही वृत्ती खतरनाक.
बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे -- पोलिसांनी तीन एफआयआर केले आहेत.- किती टक्के जळाली यावरून डॉक्टरांच्या अहवालात विसंगती आहे. - २९ पैकी कोणत्याही साक्षीदाराची साक्ष सुसंगत नाही. - अनेक साक्षीदार घटनास्थळी हजरच नव्हते.
आरोपी म्हणाला...माझे आई-वडील म्हातारे आहेत. ते माझ्यावर अवलंबून आहेत. मला पत्नी आणि छोटी मुलगी आहे. मला अटक करण्यात आली त्यावेळी ती केवळ सात दिवसांची होती. हे लक्षात घेऊन मला न्यायालयाने दया दाखवावी, असे आरोपी विकेश नगराळे न्यायालयात म्हणाला.