महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, देशाला हादरा देणाऱ्या हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या १९ दिवसांत पूर्ण केला. शिवाय शुक्रवार २८ फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले.वडनेर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आणि नागपूर-हैद्राबाद मार्गावरील एका गावातील रहिवासी असलेल्या प्राध्यापिकेवर ३ फेब्रुवारीला सकाळी हिंगणघाट येथील नंदोरी चौकात पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर तिला नागपूर येथील ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे १० फेब्रुवारीला पहाटे ६.५५ वाजता पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेच्या दिवशीपासून या क्रूर घटनेची चर्चा संपूर्ण देशात होत होती. शिवाय समाजाच्या विविधस्तरातून या घटनेचा निषेधही करण्यात आला. सुरुवातीला जवळपास १५० पानांचे दोषारोपपत्र होईल, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात होती; पण तपासाअंती आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध ४२६ पानांचे दोषारोप पत्र हिंगणघाटच्या कनिष्ठ न्यायालयात आज दाखल करण्यात आले आहे.
दोषारोपपत्रातील ठळक कागदपत्रेहिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपीविरुद्ध शुक्रवारी हिंगणघाटच्या कनिष्ठ न्यायालयात ४२६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रात प्रत्यक्षदर्शींसह साक्षदारांचे बयाण, काही महत्त्वाचे नकाशे, जप्ती पंचनामा, नागपूर येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झालेला केमिकल्सचा अहवाल, पीडितेचा शवविच्छेदन अहवाल, पीडितेच्या वैद्यकीय उपचाराची महत्त्वाची कागदपत्रे आदींचा समावेश असल्याचे खात्रीदायक पोलीस सूत्रांनी सांगितले.
हिंगणघाटच्या ठाणेदारांनी केला प्राथमिक तपासहिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा प्राथमिक तपास हिंगणघाटचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी केला. परंतु, प्रकरणाचे गांभीर्र्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास ४ फेब्रुवारीला पुलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्याकडे वळता करण्यात आला. त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास सर्व शास्त्रोक्त तसेच तांत्रिक पद्धतीने २६ दिवसांमध्ये (कार्यालयीन कामकाजाचे १९ दिवस) पूर्ण केला आहे.