लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट: जळित प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका अडवल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याला प्रत्युत्तर देत सोमवारी दुपारी १ च्या सुमारास नागरिकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
येथे दुपारी पोहचलेल्या रुग्णवाहिकेला अडवून नागरिकांनी आरोपीला शिक्षा करण्याची मागणी लावून धरली. त्यावर पोलिसांनी सदर प्राध्यापिकेवर अंत्यसंस्कार होऊ द्या अशी विनंती नागरिकांना केली. मात्र ती धुडकावून लावत नागरिकांनी रुग्णवाहिका रोखून धरल्याने पोलिसांनी नागरिकांना हटवण्यासाठी सौम्य लाठीहल्ला केला. त्यावर संतप्त होऊन नागरिकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. यावेळी रुग्णवाहिकेच्या काचाही फुटल्याचे वृत्त आहे. आरोपीला कठोर शिक्षा करा, त्याला फाशी द्या, त्यालाच जाळून टाका अशा मागण्या करत संतप्त नागरिकांचा एक समूह सकाळपासूनच राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करीत होता. या प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन आलेली रुग्णवाहिका त्यांनी काही काळासाठी अडवून धरली. यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून नागरिकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केल्याच ेवृत्त आहे.हिंगणघाटात आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून, शाळा, महाविद्यालये, दुकाने सर्व बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान या पिडितेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोक्षधाम घाटात तयारी सुरू करण्यात आली आहे.