हिंगणघाट (वर्धा) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मागणी साठी आयोजित हिंगणघाट बंद च्या आवाहनाला जनतेनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. तसेच भव्यदिव्य मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना मागणीचे निवेदन सोपविण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात १४ शासकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. विविध १४ जिल्ह्याचे यादीत वर्धा जिल्हाच नाव देखील प्रस्तावित आहे. वर्धेला दोन वैद्यकीय महाविद्यालय असल्याने जिल्ह्यासाठी मंजूर झालेले सदर महाविद्यालय जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या हिंगणघाट येथे देण्यात यावे अशी हिंगणघाट तसेच लगतच्या गांवोगांवातील नागरिकांची मागणी आहे.
त्यानुसार आज हिंगणघाट शासकिय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे वतीने आयोजीत भव्यदिव्य मोर्चा सकाळी साडेनऊ वाजता शिवाजी उद्यान येथून निघालेला मोर्चा आंबेडकर चौक, विठोबा चौक, संत तुकडोजी चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता चे दरम्यान धडकला. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थीनी व शिक्षक प्रतिनिधीच्या शिस्तमंडळाने मागणीचे निवेदन उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना मागणीचे निवेदन सोपविण्यात आले.