लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ३ लाख ३ हजार २५१ डोस आतापर्यंत लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. असे असले तरी १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या महालसीकरण माेहिमेत जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत हिंगणघाट तालुका शेवटून पहिला असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तेथे आतापर्यंत लाभार्थ्यांना व्हॅक्सिनचे ५२ हजार ८७५ डोस देण्यात आले असून, त्याची टक्केवारी ९ इतकी आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ८७५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर ६१ हजार ३७६ व्यक्तिंना कोविड व्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दररोज १२ हजार २०० व्यक्तिंना लसीकरण करण्याचे जिल्ह्याला उद्दिष्ट असले तरी सध्या लस तुटवड्याचा परिणाम या लसीकरण मोहिमेवर होत आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात विक्रमी लसीकरण झाले. त्यावेळी १ लाख १९ हजार ७८० व्यक्तिंना लसीचा पहिला, तर २३ हजार २३५ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. ताे विक्रम अजूनही कायम आहे. लसीकरण मोहिमेला गती देत एप्रिल महिन्यातील विक्रम मोडत नवा विक्रम नोंदविण्याचे आरोग्य विभागाच्या विचाराधीन आहे. पण, जिल्ह्याला दिली जात असलेला अल्प लससाठा त्यासाठी बाधा ठरत आहे. लसीकरण मोहिमेला गती मिळावी म्हणून थेट जिल्हाधिकारीही विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्याचा लसीकरणाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मी लस नाही घेतली कारण...
कोविड संकटात व्हॅक्सिन किती महत्त्वाची आहे, याची जाण आपल्याला आहे. परंतु, जिल्ह्यात सध्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तिंना कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोस देणे बंद आहे. त्यामुळे आपल्याला लसीकरणाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात लवकरात लवकर १८-४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण सुरू करावे.- मोहित वांदिले, वर्धा.
आपण घरबांधकामाचे कंत्राट घेतो. मागील काही दिवसांपासून व्यस्त राहिल्याने तसेच घराशेजारील केंद्रावर अतिशय अल्प लससाठा उपलब्ध होत असल्याने आपण लस घेण्याचे टाळले. पण, आता आपण लस नक्कीच घेणार आहे. कुटुंबातील इतर सदस्यांनी लस घेतली आहे.- अरुण जेंगठे, सिंदी (मेघे).