शेतकऱ्यांना दिलासा : कृउबास संचालकांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा वर्धा : तुरीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. व्यापारी भाव पाडून तुरी खरेदी करतात. यामुळे शासकीय खरेदी केंद्राची गरज होती. ही बाब लक्षात घेत वर्धा व हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीने केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. यावरून हिंगणघाट व वर्धा बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. वर्धा बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, संचालक रमेश खंडागळे, जगदीश मस्के, पवन गोडे, कमलाकर शेंडे, पुरूषोत्तम टोणपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किंमतीप्रमाणे तुरीची खरेदी करण्याची मागणी केली होती. शासनाने तुरीला ४ हजार ६२५ व बोनस ४२५ असे ५ हजार ५० या भावाने तुरीची खरेदी करण्याचे जाहीर केले होते. वर्धा बाजार समितीच्या यार्डवर तुरी खरेदी करण्याची मागणी होती. यावरून वर्धा बाजार समितीत ५ हजार ५० प्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. बुधवारी तूरीच्या खरेदीचे रितसर उद्घाटन वर्धा बाजार समितीत देशमुख यांच्या हस्ते होणार असून शेतकऱ्यांनी शेतमाल आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.(लोकमत न्यूूज नेटवर्क) हिंगणघाट येथे खरेदी केंद्र सुरू हिंगणघाट - शासनाने निश्चित केलेल्या किमतीनुसार बाजार समितीच्य्े ाा आवारात तूर या शेतमालाची खरेदी व्हावी, याची व्यवस्था करण्याची मागणी होती. यावरून नाफेड अंतर्गत ५ हजार ५० रुपये दराने छत्रपती शिवाजी मार्केट यार्डवर शेड क्र. ६ मध्ये खरेदी केली जात आहे. काट्याचे पूजन करून खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अॅड. सुधीर कोठारी यांनी नाफेडला आधारभूत किमतीने तूर द्यावी. रक्कम धनादेशाने देण्यात येईल, असे सांगितले. यावेळी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, उपसभापती हरिष वडतकर व संचालक हजर होते.
हिंगणघाट, वर्धेत तूर खरेदी केंद्र सुरू
By admin | Published: January 04, 2017 12:31 AM