अपघाताचा धोका : रस्त्यावर खड्ड्यांची मालिकाबोरधरण : हिंगणी ते हिंगणा हा मार्ग दोन जिल्ह्यांच्या सिमेला जोडणारा कमी अंतराचा रस्ता आहे. मात्र या रत्यावर खड्डेच-खड्डे असल्याने वाहतुकीकरिता गैरसोयीचा ठरत आहे. या रस्त्यावरील नाल्याला पावसाळ्यात पूर येत असल्याने वाहतुकीला अडचण होते. रस्त्याची डागडुजी करून नाल्याचे पक्के बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्यावरील नाला अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. बांधकाम विभागाकडून याची कोणतीच डागडुजी केली जात नसल्याचे दिसते. नागपूर व वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना हा रस्ता कमी अंतराचा असून प्रवासाचा वेळ वाचविणारा आहे. हा रस्ता हिंगणी, हिंगणा, वाडी, नागपूर असा जातो; पण या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने वाहन चालक या रस्त्याने जाण्याचे टाळतात. रस्त्यावर खड्डेच आहे. चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. हिंगणी येथून देवनगर, वानरविहरा नंतर २ किमी अंतरावर जिल्ह्याची सीमा आहे. या सिमेपासून तर हिंगणीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. या मार्गाने जडवाहनाची वर्दळ असते. वानरविहरापासून काही अंतरावर नाला आहे. हा नाला वळणरस्त्याला लागून आहे. या नाल्याला पावसाळ्यात पूर येतो. पाण्याच्या प्रवाहाने पुलाच्या खालील माती वाहून जाते. त्यामुळे तेथे भगदाड पडले आहे. दिवसेंदिवस नाल्याची रूंदी वाढत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. रात्रीच्यावेळी वाहन चालकांनी सतर्कता न बाळगल्यास अपघात अटळ आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.(वार्ताहर)पर्यटकांकरिता रस्ता डोकेदुखीचाबोर व्याघ्र प्रकल्पाकरिता बाहेरील जिल्ह्यातील पर्यटक येथे येतात. त्यांना येण्याकरिता हिंगणी मार्ग सोयीस्कर आहे. बोरधरण येथे येण्यासाठी वाडी, नागपूर, हिंगणा हा मार्ग कमी अंतराचा ठरतो. जंगल सफारीसाठी अनेकजण याच मार्गाने जातात. मात्र वाहन चालकांना खड्डेमय रस्त्यावरुन वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रस्ता खचला असल्याने पावसाळ्यात धोका वाढला आहे. याची दखल घेणे गरजेचे ठरत आहे.
हिंगणी ते हिंगणा मार्गाची दैना
By admin | Published: July 01, 2016 2:11 AM