लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वगुणसंपन्न अशा विदर्भाचा नावलौकिक असला तरी त्याचे दस्तावेजीकरण झालेले नाही. ही बाब हेरत काही प्रगल्भ लेखकांनी पुढाकार घेऊन या संपूर्ण इतिहासाचा मागोवा घेत, त्यात वर्तमान प्रमुख घडामोडींचेही संकलन करीत विदर्भाची इत्यंभूत माहिती कागदावर उतरण्याचे कार्य सुरू केले आहे. यात वर्धा जिल्ह्याचा इतिहासही पुस्तक रूपात येणार आहे.वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकला, प्रबोधनाचा वसा देणारे संतांचे कार्य , विविधतेने नटलेला निसर्ग व वैशिष्ट्यपूर्ण लोकजीवन असणाऱ्या आपल्या जिल्ह्याच्या प्राचीन राजवटीपासून ते आजच्या राजकारणापर्यंत, संत चळवळीपासून आजच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीपर्यंत आणि विनोबा- गांधीजींच्या आगमनापासून ते जिल्ह्याची स्वातंत्र्योत्तर वाटचाल अधोरेखित केली जाणार आहे.प्राचीन मध्ययुगीन साहित्य निर्मितीचा आजच्या काळाची संबंध साधला जाणार आहे. संपूर्ण सांस्कृतिक पर्यावरणाचा साक्षेपी साधार, चिकित्सक वेध घेण्याचे महत्त्वाकांक्षी आणि धाडसी कार्य विदर्भातच युद्धपातळीवर सुरू आहे. विदर्भाचा सांस्कृतिक इतिहास कागदावर या माध्यमातून जिवंत होत आहे.
इतिहास ग्रंथरूपातया स्मृतिरूप इतिहासाचे ग्रंथरूपाने दस्तावेजीकरण होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या संकल्पनेतून व समीक्षक डॉ. अजय देशपांडे यांच्या संपादनात हा प्रकल्प सुरू आहे.
अकराही जिल्ह्याचा इतिहास आठ खंडांमध्येया स्मृतिरूप ग्रंथात विदर्भातील अकराही जिल्ह्याचा इतिहास ८ खंडात समाविष्ट केला जात आहे. यात वर्धा जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची जबाबदारी अभ्यासक डॉ. राजेंद्र मुंढे यांच्यावर संपादक मंडळाने सोपविली आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यक्ती, इतिहासाचे जाणकार, स्वातंत्र्य सैनिक, कार्यकर्ते तसेच ज्यांच्याकडे वर्धा जिल्ह्याची माहिती, दुर्मिळ कागदपत्रे, छायाचित्रे, नकाशे आदी असेल तर ती द्यावी. त्यांनी दिलेल्या माहितीचा लेखन कार्यात उपयोग झाल्याचा स्पष्टपणे नामनिर्देश केला जाईल . असे डॉ. राजेंद्र मुंढे यांनी म्हटले आहे.