लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पंजाब नॅशनल बँकेत पीककर्जाची मागणी करण्यासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला देवळीच्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांनी थेट मारहाण केली. ही घटना अंदोरी येथील बँकेत घडली. या प्रकरणी शेतकरी प्रशांत चौधरी यांच्या तक्रारीवरून आरोपी महिला तहसीलदाराविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यासाठी प्रभारी तहसीलदार भागवत या अंदोरी येथे गेल्या होत्या. दरम्यान पीककर्जाअभावी आधीच त्रस्त असलेल्या चौधरी यांनी तहसीलदारांची भेट घेवून पीककर्जाबाबत व बँक अधिकाऱ्यांच्या वागणुकीबाबत आपली व्यथा त्यांच्याकडे मांडली.शेतकऱ्याची समस्या लक्षात घेवून तहसीलदारांनी सदर शेतकऱ्याला बँकेत नेले. यावेळी तक्रारकर्ता शेतकरी वरचढ होत बोलत असल्याने तहसीलदारांची सटकली. याच वेळी तहसीलदार भागवत यांनी थेट शेतकऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकही थक्कच झाले. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर आज सदर शेतकऱ्याने थेट देवळी पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून देवळी पोलिसांनी आरोपी महिला तहसीलदारांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.प्रहारकडून निलंबनाची मागणीवर्धा : शेतकऱ्याला मारहाण करणे ही बाब निंदनीयच आहे. शेतकरी प्रशांत चौधरी याला मारहाण करणाऱ्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांच्याविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा त्यांच्यावर झालेला अन्यायच आहे. सदर तहसीलदारावर कठोर फौजदारी कारवाई करीत त्यांना ४८ तासांच्या आत अटक करावी. शिवाय जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तहसीलदारांवर निलंबणाची कारवाई करावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना राजेश सावरकर, विकास दांडगे, प्रशांत चौधरी, प्रमोद कुऱ्हाटकर, शैलेश सहारे, तुशार वाघ, तुशार कोंडे, जय वाकडे, गजानन चौधरी, चेतन वैद्य, मधुकर नागपूरे आदींची उपस्थिती होती.
तहसीलदारांकडून चक्क शेतकऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 9:50 PM
पंजाब नॅशनल बँकेत पीककर्जाची मागणी करण्यासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला देवळीच्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांनी थेट मारहाण केली. ही घटना अंदोरी येथील बँकेत घडली.
ठळक मुद्देअंदोरी येथील घटना : देवळी ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल