वर्धा,दि. 11- सणासुदीच्या दिवसात नागरिकांकडून चिनी बनावटीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. चीनसाठी भारत हा मोठी बाजारपेठ आहे. मात्र सध्या चीन भारताकडे डोळे वटारुन बघत असून त्या देशाला धडा शिकवण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन 'युवा परिवर्तन की आवाज'नं करत चिनी वस्तूंची होळी केली.
शिवाय, केंद्र सरकारने याप्रकरणी ठोस पाऊल उचलावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात तरुण-तरुणींनीदेखीस या आंदोलनात सहभाग नोंदवला. शहरातील शिवाजी चौकात तरूण-तरूणींनी चिनी बनावटीच्या वस्तूंची होळी केली. डोकलाम वादावरुन भारत-चीन आमनेसामने उभे ठाकले आहेत. शिवाय चीनच्या कुरापतींमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणाम चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी केंद्र सरकारनं योग्य पाऊलं उचलावीत,अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती.
यावेळी तरुण-तरूणींनी जोरदार चीनविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, राहुल मिश्रा, सोनू दाते, अक्षय बाळसराफ, पूजा कोकाटे, शीतल ऐकोनकार, नेहा वैरागडे, वैशाली खेकारे, प्रतीक्षा गुजर, अनु वांदिले यांच्यासह मोठ्या संख्येने युवा परितवर्तन की आवाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.