लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सेवाग्राम आणि पवनार आश्रमात आल्यानंतर येथून आत्मचिंतनातून काही शिकायला मिळतं. त्यामुळे दरवर्षी वर्ध्याला यायची परंतु कोरोना काळामुळे दीड वर्षांत येणं झालं नाही म्हणून वैयक्तिक कारणास्तव हा वर्ध्याचा दौरा केला. वर्ध्याशी आमचं जवळचं नातं असल्याने येथून कार्य करण्याची नवीन ऊर्मी मिळते, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. शिववैभव सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसलाच नाही तर महाविकास आघाडीला टार्गेट केले जात आहे. कुणाची आई तर कुणाच्या बायकोला पोलीस ठाण्यात बोलावले जातं. असा प्रकार भारतीय संस्कृतीत आजपर्यंत बघितलेला नाही; हे सर्व दुदैवी आहे. आता या सर्वांची आम्हालाही सवय झाली असून आम्ही खंबीर आहोत,असे खा. सुळे यांनी सांगितले. यासोबतच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील भूमिगत गटार योजना, महिलांच्या बचतगटांचे प्रश्न, भटक्या विमुक्त जातीचा प्रश्न आणि पोलिसांकडून निर्माण होत असलेल्या पेट्रोल पंपचा प्रश्न मांडला. यासंदर्भात माझी नैतिक जबाबदारी म्हणून येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री यांच्यासह वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असेही खा. सुळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊल, माजी आमदार राजू तिमांडे, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, किशोर माथनकर व प्रा. दिवाकर गमे आदींची उपस्थिती होती.
आधी घरातील नातं, नंतर राजकारणखासदार सुप्रिया सुळे यांच्या वर्धा दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे नेते समीर देशमुख यांच्या सोबत दिसून आले. त्यामुळे ते घरवापसी करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर ‘हे महाविकास आघाडीच सरकार आहे. येथे कुण्या एका पक्षांचा व्यक्ती म्हणून वेगळं बघू नका.‘समीर’ हा आमच्या घरातील मुलगा आहे. आधी परिवाराचं नातं आणि नंतर राजकारण’, असं उत्तर देऊन प्रश्नावरच पडदा टाकला.
सेवाग्रामात दारूविक्री...!- जिल्ह्यात दारुबंदी असतानाही खुलेआम दारूविक्री केली जात आहे. याची माहिती पोलीस प्रशासनाला असूनही आर्थिक लोभापोटी याकडे दुर्लक्ष केले जात आहे.- इतकच नाही तर सेवाग्राम परिसरातही मोठ्या प्रमाणात दारूविक्री होते. त्यामुळे दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा अन्यथा दारूविक्री खुली करा, अशी मागणी होत असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आणून दिले. - सेवाग्राममध्ये दारूविक्री होते, ही अस्वस्थ करणारी बाब आहे. यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.