चित्रा रणनवरे : डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार वितरण सोहळा वर्धा : आशा सेविका आरोग्य प्रशासनातील मुख्य घटक आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यात त्या दुवा म्हणून काम करतात. समाजातील अंतिम घटकापर्यंत आरोग्य विषयक योजना प्रभावीपणे पोहोचत आहे. याचे श्रेय आशा सेविकांना जाते, असे गौरवोद्गार जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे यांनी काढले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जि.प. आरोग्य प्रशासनाद्वारे जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा घेण्यात आला. यावेळी उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, कायाकल्प पुरस्कार, सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या. अतिथी म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, पशुसंवर्धन सभापती श्यामलता अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. चव्हाण, माजी सभापती मिलिंद भेंडे, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी आडकर, डॉ. गहलोत आदी उपस्थित होते. मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. यावर्षीच्या कायाकल्प पुरस्कारात प्रथम स्थान प्राथमिक आरोग्य केंद्र साहूर तर द्वितीय पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र हमदापूरने प्राप्त केले.
आशा सेविका प्रशासन व जनतेतील दुवा
By admin | Published: March 09, 2017 12:57 AM