लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात सात ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले. यात एकूण ४१८ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, सध्या तेथे केवळ ५१ ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही मोठ्या कोविड रुग्णालयांतील सर्वच खाटा फुल्ल आहेत.कोविडची सौम्य लक्षणे असलेल्यांसह लक्षणविरहित कोरोनाग्रस्तांना सध्या स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. परंतु, अनेक व्यक्ती अलगीकरणासाठी घरात वेगळी व्यवस्था नसतानाही होम आयसोलेशनची मागणी करीत आहेत, तर काही सुजाण ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त स्वत:च खबरदारीचा उपाय म्हणून कोविड केअर सेंटरमध्ये जाण्याची इच्छा दर्शवित आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण सात कोविड केअर सेंटर असून, त्यात तब्बल ५१ ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. कोविड केअर सेंटरमधील तब्बल ३६८ रुग्णखाटा सध्या रिक्त आहेत. असे असले तरी भविष्यातील धोका लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोविड विषाणूच्या संसर्गाला प्रभावीपणे ब्रेक लावण्यासाठी ज्या कोविड बाधिताच्या घरी गृहअलगीकरणाची वेगळी व्यवस्था नाही अशांना सीसीसी केंद्रांत ठेवले गेले पाहिजे.
रुग्णांसाठी बेड मिळविण्याकरिता वणवणजिल्हा प्रशासनाने ‘ई-सेवा वर्धा डॉट इन’ हे संकेत स्थळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक जाहीर केला असला तरी अनेक रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना कोविड हॉस्पिटल मधील ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडसाठी वणवण भटकंतीच करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
बेडच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षकोविड रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तसेच सर्वसाधारण बेडच्या उपलब्धतेबाबत रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना माहिती मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ०७१५२-२४३४४६ या क्रमांकावर कॉल केल्यावर कुठल्या रुग्णालयात खाट रिक्त, याची माहिती नागरिकांना दिली जात आहे.
आयसीयू, ऑक्सिजन अन् व्हेंटिलेटर बेड फुल्लसेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयाच्या कोविड युनिटमधील आयसीयू, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेड सद्यस्थितीत फुल्ल आहेत. त्यामुळे सध्याच्या काेविड संकटाच्या काळात प्रत्येक वर्धेकराने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.