सेलगाव (लवने) : ग्रामपंचायतीने एकाच्या नावाने घरकूल मंजूर केले; मात्र त्याच्याकडे जागा नसल्याने त्याने नातलगाच्या नावावर असलेल्या जागेवर बांधकाम केले. त्या घरात तो राहू लागला. अशात तो काही कामानिमित्त बाहेर गेला असता ज्याच्या नावावर जागा होती त्याच्या वारसदाराने येवून त्या घरावर कब्जा केला. यामुळे घरात वास्तव्यास असलेल्याने माझे घरकूल चोरीला गेल्याचा टाहो फोडला आहे. येथील रादास शंकर तिईले यांना २००२-०३ या वर्षात ग्रामसभेतून घरकूल मंजूर झाले; परंतु रामदास तिईले यांच्या नावे गावाच्या हद्दीत जाग नसल्यामुळे त्यांनी नातेवाईक श्यामराव लहानू बेंडे यांच्या जागेवरच शासनाकडून मिळालेल्या अनुदानातून घरकुलाचे बांधकाम केले. गत दहा बारा वर्षांपासून त्याच घरकुलात राहत होते; परंतु गत तीन महिन्यापासून ते आपल्या मुलीकडे काही कामानिमित्त गेले. याचाच फायदा ज्यांच्या नावे या घरकुलाची जागा होती त्याने घेतला. जागेचा मालकी हक्क असलेल्या श्यामराव बेंडे यांचा नातू नरेश बेंडे हा नागपूरवरून गावात आला व मीच या घरकुलाचा खरा मालक असून हे घर माझेच आहे. असे म्हणत त्याने या घराची दुरूस्ती केली व कुलूप लावून नागपूरला निघून गेला. त्यानंतर रामदास घरी आला व आपल्या घरी गेला; परतु बघतो तर काय घराला कुलूप. दारही दुसरेच. सभोवतालचे चित्र वेगळेच. त्यामुळे तो रडत गावभर फिरत होता. मी राहू कुठे, आता जावू कुठे. त्यामुळे गावात एकच चर्चा ऐकायला मिळत होती, घरकुलच गेले चोरीला. (वार्ताहर)
एकाच्या जागेवर दुसऱ्याचे घरकूल
By admin | Published: June 30, 2014 12:02 AM