तळेगाव (श्या.पंत.) : अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून भस्मसात झाले. ही घटना नजीकच्या भारसवाडा येथे घडली असून, या घटनेमुळे कष्टकऱ्याचा संसारच उघड्यावर आला आहे.
भारसवाडा येथील गणेश पांडुरंग रुंधे ( ७८) हे पत्नीसह राहत असून दोन दिवसांपूर्वी ते बाभूळगाव ता. सेलू येथे मुलीकडे गेले. अशातच शुक्रवारी रुंधे यांच्या घराला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला; पण त्यांचे प्रयत्न कमी पडत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आगीत घरातील लाकूड फाट्यासह धान्य, घरातील विविध साहित्य तसेच कपडे, सोने, रोख रक्कम जळून खाक झाल्याने रुंधे यांचे तीन लाखांचे नुकसान झाले असून रुंधे कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला आहे.
आगीच्या झळा रुंधे यांचे शेजारी भाष्कर जवंजाळ यांच्या घरालाही बसल्या असून त्यांचेही नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच आष्टीचे नायब तहसीलदार दीपक काळुसे, तलाठी आठवले यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची अपेक्षा असून तशी मागणीही आहे.