वर्धा : घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तीन शेळ्या तसेच घरातील रोख आणि दागिने जळून कोळसा झाला. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेमुळे या कुटुंबावर संकटाचा डोंगरच कोसळला आहे. आगरगांव गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिपरी ( खराबे ) येथे नागरिकांची दिनचर्येतील कामे सुरळीत सुरू असताना घरात गॅस सिलिंडर लिक झाल्याने आग लागली. पाहता-पाहता आगीने संपूर्ण घर आपल्या कवेत घेतले.
आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. शिवाय अग्निशन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पण या आगीत दोन ते तीन दिवसांपूर्वी कापूस विक्री करून प्राप्त झालेली रोख रक्कम, घरात बांधून असलेल्या तीन शेळ्या, घरातील दागिने जळून खाक झाले.
खबरदारी घेण्याकडे विक्रेत्याचीही पाठच..
पुलगाव येथील ईशा इंडियन कंपनी या अधिकृत विक्रेत्याकडून पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांनी नुकतेच गॅस सिलिंडर घेतले होते. गॅस सिलिंडरची विक्री करताना गॅस सिलिंडर लिक तर नाही ना याची शहानिशा विक्रेत्याकडून करणे क्रमप्राप्त आहे. पण सिलिंडर तपासा असे म्हटल्यावरही सर्वच बरोबर असल्याचे सांगून गॅस सिलिंडर पंधरे यांना देण्यात आले. पूर्वीच गॅस सिलिंडर लिक आहे काय याची शहानिशा करण्यात आली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असती अशी चर्चा घटनास्थळी होती.